
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज जेऊर येथील महावितरण उपविभाग कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रचंड जनसागर उसळला. करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून शांततापूर्ण मार्गाने धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाळत असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमधून सकाळपासूनच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने जेऊर येथे एकत्र आले होते.

प्रशासनासमोर मांडल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर तालुक्यातील भीषण वास्तव मांडत पाच प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले :
शेतीपंपांना नियमित वीज : पिकांचे नुकसान टाळण्यासाठी दिवसा किमान ८ तास पूर्ण दाबाने (Full Voltage) अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा.
२४ तास सिंगल फेज वीज : सर्व गावांमध्ये घरगुती वापरासाठी अखंडित सिंगल फेज वीज द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल.
डीपी तातडीने बदलणे : जळालेले अथवा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर २४ ते ४८ तासांच्या आत बदलून मिळावेत.
अवाजवी बिलांची दुरुस्ती : वीज नसतानाही पाठवण्यात आलेली सरासरी व अतिरिक्त बिले तात्काळ दुरुस्त करावीत आणि सक्तीची वीज तोडणी मोहीम थांबवावी.
तक्रार निवारण यंत्रणा : ग्रामीण भागातील वीज वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच शेतकऱ्यांचे फोन उचलण्यासंदर्भात स्थानिक कर्मचाऱ्यांना सक्त सूचना द्याव्यात.
आंदोलनाची तीव्रता आणि शेतकऱ्यांचा वाढता दबाव पाहून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले आणि तालुक्यातील वीज समस्या लवकरच मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
या आंदोलनात तालुक्यातील प्रमुख म्हणून शंभूराजे जगताप, अक्षय शिंगटे, सुनील सरडे, तात्या सुरवसे, पप्पू गव्हाणे, रोहित कोकाटे, अविनाश सरडे, दादासाहेब लबडे, दिनकर सरडे, चंद्रकांत लखपती सरडे, मच्छिंद्र सरडे, संदीप सरडे, युनूस सय्यद, शंकर बोंद्रे, बापू राऊत, बापू सरडे, हेमंत बारकुंड, अजिंक्य सरडे, राजेंद्र गव्हाणे, शामराव गव्हाणे, विठ्ठल नेमाने, टिंकू सरडे, प्रमोद सरडे, चंद्रकांत सरडे, रामेश्वर सरडे, सचिन गावडे, महेश पवार, दादासाहेब सरडे, शिवाजी नेमाने, आशिष पाटील, मांजरे साहेब, दीपक लबडे, सोमनाथ पठाडे, महादेव डफळ, मनोहर गुंडगिरे, प्रवीण भोसले, सागर दौंड, आनंद शिंदे, नितीन भोसले, रणजीत लबडे, नानासाहेब पवार, राहुल गोळे, बाबू गोळे, दयावान तळेकर आदींसह हजारो शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………
’शेतकऱ्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही’ — शंभूराजे जगताप
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप म्हणाले, “वीज हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे. वारंवार वीज खंडित करून महावितरण ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळखिळे करत आहे. रात्रीच्या अंधारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलेली ही एकजूट प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी आहे. जर प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर हा लढा यापेक्षा अधिक तीव्र केला जाईल.”