
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवाला अधिक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक आयाम प्राप्त होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या परंपरा, कला, संस्कृती, लोकजीवन, हस्तकला आणि वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रचारमोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठाद्वारे गणेशोत्सवाचे दस्तऐवजीकरण करणे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो समाजातील आध्यात्मिक, सामाजिक आणि उद्यमशीलता वाढवणारी लोकचळवळ आहे. या उत्सवामध्ये स्थानिक कारागीर, मूर्तिकार, कलाकार, हस्तकला करणारे कुशल कारागीर, सजावट करणारे तरुण-तरुणी, तसेच विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपरंपरा आणि लोककलांचे मोठे योगदान दिसते. म्हणूनच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मानांकन मिळवून देण्याच्या उद्देशाने वर्षभर सातत्याने उपक्रम राबवण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाने दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी Bappa.org अभियानात सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या मंडळाच्या मांडणीतील वैशिष्ट्ये, मूर्ती स्थापना व निर्मितीची पारंपरिक पद्धत, सजावटीची कलात्मक मांडणी, स्थानिक हस्तकला, लोकजीवनाशी निगडित ऐतिहासिक संदर्भ (असल्यास), तसेच खाद्यपरंपरा यांचे फोटो व माहिती संकलित करून Bappa.org वर नोंदविणे अपेक्षित आहे. तसेच त्या प्रक्रियेमागील स्थानिक कलाकार, लोककलावंत, मूर्तिकार, कारागीर यांची माहिती व त्यांच्या कला-कौशल्याचे दस्तऐवजीकरण करणेही आवश्यक आहे. यामुळे पुढील पिढ्यांसाठी ज्ञान जतन होईल, तर दुसरीकडे बाहेरच्या जगाला ‘महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची’ खरी ओळख मिळेल.
त्याचप्रमाणे ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमातून नागरिकांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरगुती गणपती असो अथवा पारंपरिक पद्धतीने बसवलेला गणेशोत्सव—आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे काही फोटो आणि थोडक्यात माहिती Bappa.org वर नोंदवा. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाचे अधिकृत Digital Cultural Preserver Certificate दिले जाणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करण्यास नागरिकांचा अधिक उत्स्फूर्त सहभाग वाढेल.
या मोहिमेचा प्रचार प्रभावीपणे होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण संस्था, RWAs, ग्रामपंचायती, बचत गट तसेच विविध WhatsApp समूहांवर *लिंक व QR Code* प्रसारित केले जाणार आहेत. प्रचार साहित्य, होर्डिंग्ज, पोस्टर्स, स्टँडीज, QR कोड अशा माध्यमांतून सर्वत्र संदेश पोहोचवला जाणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सातत्याने प्रसिद्धी दिली जाणार आहे.
शेवटी, सोलापूर जिल्ह्याचा गणेशोत्सव हा आमच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे. म्हणूनच सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा—फोटो, कला, परंपरा व लोकपरंपरा—जगापर्यंत पोहोचवण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.