
राजकारणात सर्वसामान्य घरातील एखाद्या माणसाने मोठी स्वप्न पहाणे म्हणजे सोप्पी गोष्ट नसते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठराविक काही नेतृत्व आहेत जे नेतृत्व सर्वसामान्य घरातुनच पुढे आली आहेत. स्वतःचे काम.. सर्वसामान्यांचा पाठींबा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन केलेला संघर्ष.. या सर्व गोष्टीच अशा नेतृत्वांना घडवत असतात. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता अशा संघर्षमय प्रवास केलेल्या नेतृत्वांसाठीच वाटते.. ” लहरोंसे डरकर नौका पार नही होती- कोशिश करने वालों की कभी हार नही होती.. नन्ही चिटी दाना लेकर जब चलती है.. चढती दिवारों पर सौ बार फिसलती है ! चढ़कर गिरना-गिरकर चढना.. न अखरती है !.. आखिर ऊसकी कोशिश बेकार नही होती.. कोशिश करने वालों की हार नहीं होती !”… अशाच काही संघर्षातून घडलेलं एक नेतृत्व म्हणजे करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने

यांचा संघर्षमय प्रवास पाहुन कळते. साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या पोराने गावचे शिवसेना शाखेचा एक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गावचा सरपंच ते पंचायत समितीचा उपसभापती पदापर्यंत मारलेली मजल ही एक संघर्षगाथा आहे. मी त्याच्या संघर्षाचा काळ पाहिलेला आहे. शालेय जीवनात प्रत्येक ॲक्टीव्हीटीज मधे त्याचा असणारा सहभाग मला आजही आठवतो. वक्तृत्व स्पर्धा असो किंवा नाटक,नकला, गाणी किंवा फुटबॉल, क्रिकेटचा खेळ असो प्रत्येक गोष्टीसाठी तो सहभागी असणारच.. गणेशोत्सवाच्या काळात नेतृत्व करून बाल गणेश मंडळ स्थापन करून गणपती बसविणे, डेकोरेशन साठी सर्वांचे संगठन करून काही तरी चॅलेंजिंग गोष्टी करणे.. आणि अशक्य गोष्टीवर चर्चा करून अशी एखादी गोष्ट आपण केली पाहिजे.. हे पॉझिटीव्ह माइंड असलेला हा माणूस.. एखादा भिख मागणारा.. भाकरी मागणारा..रस्त्यावरचा माणूस पाहुनही या

लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे..म्हणून विचार मांडणारा, शालेय जीवनापासून सोबतीच्या संवगड्यांनाही वह्या-पुस्तके पुरविणारा.. दोस्ती निभावणारा असा त्याचा स्वभाव… परगावातून आलेल्या मित्राच्या डब्यातली भाजी खराब होते म्हणून त्यांचेसाठी आवर्जुन आपल्या घरी आईला रोज मित्रांसाठीही भाजी भाकरी देण्यासाठी आग्रही असणारा हा मित्र आजही आठवतो. गावतल्या राजकारणात सहभाग घ्यायचा, लोकांची सेवा करायची.. ही स्वप्ने त्याला लहानपणापासून पडायची. नदीवर पोहायला गेल्यावर पोमलवाडी ते केत्तुर आणि चांडगाव ते पोमलवाडी असा पूल का असु नये.. रेल्वे स्टेशनला एक्स्प्रेस का थांबत नाहीत.. गावात मोठी बँक का नाही.. आपले रस्ते का होत नाहीत… यावर विचार करणारा व मांडणारा हा दोस्त… पुढे

जाऊन नक्कीच काही तरी करणार याची जाणिव नेहमीच व्हायची. स्व. प्रमोद महाजन, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्व. विलासराव देशमुख आणि तत्कालिन पुढाऱ्यांची भाषणे ऐकण्यासाठी मी त्याला कित्येकवेळा प्रवृत्त करायचो. शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या या मित्राने वयाच्या सतरा आठरा वर्षाचा असताना राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला शिवसेनेच्या माध्यमातून शाखा प्रमुख म्हणून केलेली सुरुवात.. आजही आठवते. शाखाप्रमुख असतानाच रेल्वे स्टेशनला एक्स्प्रेस गाडीचा थांबा मिळविण्यासाठी लढा ऊभा केला. यासाठी संबंधित विभागाना अर्ज देणे, आंदोलनाचे नियोजन करणे व आंदोलन यशस्वी करणे. प्रत्येक सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवणे हे त्याचे नित्याचेच होते. एखादया कामाची फाईल तयार करताना त्याचा संपूर्ण आणि परफेक्ट अभ्यास करून त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करायची.. त्या फाइल्स तयार करताना स्वतःचे खिशातून पैसे घालायचे असा त्याचा कार्यक्रम ठरलेलाच. सोशल माईंडचा असणारा हा

मित्र पुढे जाऊन राजकारणात नक्कीच भरारी घेईल हे मनोमन वाटायचे.. त्या काळात विधानसभेला शिवसेना उमेदवार ॲड. शिवाजीराव मांगले यांचे प्रचार कार्यात हिरिरीने सहभागी होऊन तडाखेबाज भाषणे केली.. शिवसेनेच्या विविध मोर्चा आणि आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. पुढे करमाळा तालुक्यातील आदिनाथ सह. साखर कारखान्याचे निवडणुकीत संस्थापक स्व. गोविंदबापु पाटील, स्व. शिवाजीराव मांगले, डांगे यांनी तयार केलेल्या आदिनाथ बचाव पॅनलचा प्रचारही ताकदीने केला. तत्कालिन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. अजय दासरी सर यांनी त्यांची शिवसेना विभागप्रमुख म्हणून निवड केली. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकात करमाळा तालुक्यात शिवसेना शाखा विस्तारासह पक्षाचे संघटन मजबुत केले. खरे तर घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिला राजकारणात सहजासहजी काही मिळत नाही..आपण संघर्षातुन निर्माण झालेली अनेक राजकीय नेतृत्व पाहिली आहेत. ॲड. अजित विघ्ने यांनी पण इथपर्यंत

पोहोचण्यासाठी खुप संघर्ष केलेला आहे. केत्तुर आणि परिसरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धडपडणाऱ्या या मित्राला १९९७ साली लोकांनी केत्तुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणले आणि तरुण वयात गावच्या उपसरपंचदाची जबाबदारीही मिळाली.. त्यानंतर माजी मंत्री स्व. दिगंबरमामा बागल यांनी आवर्जुन त्यांना बागल गटात घेऊन ताकद दिली. तत्कालिन ग्रामविकास मंत्री आर.आर.(आबा)पाटील यांचे कडे शिफारस करून संजय गांधी निराधार योजने सारख्या महत्वाच्या समिती मधे काम करण्याची संधी दिली. आपल्या कडे आलेल्या पदाचा पुरेपुर उपयोग करून गावातील विकासकामे, घरकुल योजना, निराधार योजना माध्यमातुन त्यांनी भरीव काम केले. राजकारणात सक्रीय असतानाच एकीकडे ग्रज्युएशन पूर्ण करून वकीलीची सनद मिळवली. सुरुवातीला बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महविद्यालयात आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेजमधुन शिक्षण घेतले. दरम्यानचे काळात मित्रांचे सहवासातुन स्व. अजितदादा पवार यांचे नेतृत्वात विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. मंत्री दिगंबरराव बागल यांचा एक जवळचा युवक कार्यकर्ता म्हणून नावलौकीक मिळत असतानाच मंत्री. दिगंबरराव बागल यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे निधनानंतरच्या काळात काही राजकीय कुरघोडीमुळे त्यांनी बागल गटाला रामराम ठोकला आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नेतृत्व स्विकारून जगताप गटात प्रवेश केला. सन-२०१२ साली जिल्हा परिषद/ पंचायत समिती निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी त्यांना केत्तुर गणातून ऊमेदवारी दिली मात्र त्यावेळी पारेवाडी गावात झालेल्या बोगस मतदानामुळे अवघ्या ३८५ मतांनी त्यांना पराभुत व्हावे लागले. वकीली बरोबरच राजकारण, समाजकारण करत असताना गावातील व परिसरातील विकासकामांसाठी, रेल्वे थांब्याकरीता, रस्ते/ पुलाकरीता संघर्ष चालूच होता. सन-२०१४ साली त्यांनी जि.प.सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचे नेतृत्वात आमदार नारायण पाटील यांचे गटात प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत नारायण (आबा) पाटील निवडून आले या मधे प्रचारकार्य व यंत्रणेत त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. पुढे २०१७ चे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतुन सर्वसाधारण जागेवर सरपंच होण्याची संधी होती. गावात आमदार पाटील गटाचे प्राबल्य लक्षात घेता निवडणुक सहज जिंकुन सरपंच होण्याची इच्छा होती. मात्र त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांना नेतेमंडळींची साथ लाभली नाही परिणामी एकाकी झुंज देण्याची वेळ आली. पराभव झाला मात्र न खचता आपले काम चालु ठेवले. २०१७-१८ मधे केत्तुर नं-१ ते केत्तुर नं-२ आणि केत्तुर नं-२ ते पोमलवाडी येथे भिमा नदीवरील पुलाचे कामाकरीता गावातील नेतेमंडळी सोबत राहुन एक एक कोटीपर्यंत लोकवर्गणी जमा करणे, त्याचे काम पुर्णत्वाकडे नेहणेचे काम केले. तत्कालिन परिस्थितीत पुलाची कामे होत असताना शेजारील गावातील लोकांनी गैरसमजातून हायकोर्टात याचिका दाखल केली व पुलांचे कामाला अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र शांत, संयमी राहुन व समन्वय ठेवुन हायकोर्टात योग्य बाजु मांडून केस जिंकली. हायकोर्टात महाराष्ट्र शासनातर्फे पुलांची पक्की कामे १ वर्षात पुर्ण करून देणार असे प्रतिज्ञापत्र सादर झाले. २०१८ च्या राज्याचे अर्थसंकल्पात केत्तुर व पोमलवाडी येथील पुलासाठी तब्बल आठ-आठ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली. हे पुल साकारल्यानंतर गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली व एसबीआय सारखी एक बँक गावात आणली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाडीच्या थांब्याकरीता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे व रेल्वे मंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा करून कलबुर्गी व हरंगुळ या गाड्यांचा थांबा मिळविला. प्रवाशांना लातुर व सोलापुरकडे जाण्यासाठी गाड्यांची चांगली सोय त्यामुळे झाली असुन, भविष्यात पुणे, मुंबईच्या प्रवाशांकरीता चैन्नई-मुंबई एक्सप्रेस किंवा हैदराबाद- मुंबई या गाड्यांना रेल्वे स्टेशनवर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. १९९३ साली केलेला रेलरोको असु द्या किंवा मागिल वर्षी केलेला एल्गार मोर्चा असु द्या यात स्वतः झोकुन देत आपले काम त्यांनी चालूच ठेवले आहे. सन-२०२१ साली करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वावर आणि विकासकामांचे व्हीजन यावर विश्वास ठेवुन संजयमामांचे गटात प्रवेश केला. व संजयमामा शिंदे यांनी “गॉड फादर” व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. मामांनी डिकसळ- कोंढार चिंचोली पुलाकरीता स्व.नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे माध्यमातुन ५५ कोटी आणि कुगाव ते शिरसोडी पुलासाठी ३८२ कोटींची मंजुरी मिळवलेली होती. अजितरावांचे पश्चिम भागातील चांडगाव ते पोमलवाडी या महत्वाकांक्षी पुलाचे मंजुरी करीता प्रयत्न चालु होते. याबाबत संजयमामांशी बोलणे झाले आणि याबाबतची फाईल सुरुवातीला केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांना देण्यात आली. मात्र हा पुल सुद्धा अजितदादांचे माध्यमातुनच होईल अशी खात्री असलेल्या संजयमामांनी अजितदादांकडे या पुलाबाबत साकडे घातले आणि अजितदादा पवार यांनीही सकारात्मकता दाखवत या पुलाचे मंजुरी करीता शब्द दिला. पुढे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजयमामांना पराभव स्विकारावा लागला मात्र या पुलाचे मंजुरीची सर्व जबाबदारी मंत्री दत्तामामा भरणे यांचेवर टाकुन पुलाचे मंजुरी करीताचे विशेष प्रयत्न केले. आणि पोमलवाडी ते चांडगाव पुलाला अर्थसंकल्पातून तब्बल ३४० कोटी मंजुर केले आहेत. एका जिद्दी आणि चिकाटी असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. दरम्यानचे काळात संजयमामांनी विघ्ने यांच्यातील नेतृत्व गुणाची पारख करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या करमाळा तालुक्याचे प्रवक्ते पदाची महत्वाची जबाबदारी दिली. स्वतः उपसरपंच, विविध समितीवर झालेली निवड, पत्नी भारतीताई सरपंच, यासह सोबतीच्या मित्र परिवारात सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणून काम करण्याची संधी या सर्व गोष्टी या युवक नेत्याला त्याचे कार्यतत्परतेने प्राप्त झाल्या मात्र तालुका पातळीवर मोठ्या पदावर बसण्यासाठी त्यांना योग्य संधी लाभलेली नव्हती. अभ्यासु असणाऱ्या व सर्वांशी योग्य संवाद साधुन कार्यरत असणाऱ्या या युवक नेत्याला सन-२०२६ च्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी योग्य संधी देत केत्तुर पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली. आणि भागोदय झाला बागल गटाबरोबर झालेली युती, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा आशिर्वाद यासह पश्चिम भागातील नेते माजी जि.प. उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे व माजी जि.प.सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचे भक्कम पाठबळ आणि सर्वसामान्यांची साथ या जोरावर ते केत्तुर गणातून तब्बल २६०० मतांची विक्रमी आघाडी घेऊन निवडून आले आहेत. आणि सर्वात महत्वपूर्ण भागोदय म्हणजे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांना करमाळा तालुका पंचायत समितीचे उपसभापती पदावर विराजमान होण्याची योग्य संधी दिली आहे. एक शिवसेनेचा शाखाप्रमुख, उपसरपंच ते करमाळा पंचायत समितीचा उपसभापती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास वाटतो एवढा सोप्पा नाही. निश्चित्तच प्रत्येक यशस्वी पाऊल टाकण्यासाठी त्यांना आजपर्यंत संघर्षमय प्रवास करावा लागला आहे. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय.. जिद्द, चिकाटी.. सर्वसामान्याच्या सुख दुःखात कायम उभे राहण्याची वृत्ती यामुळेच आज त्यांची कारकीर्द यशस्वी झाली आहे. त्यांचे यशाची खरे तर ही एक संघर्षगाथा आहे. करमाळा तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आशिर्वादाने ते कायम कार्यरत राहतील व त्यांचे अभ्यासु व कार्यकुशल नेतृत्व गुणाचा संपुर्ण तालुक्याला निश्चितच फायदा होईल ! आज दिनांक २६ जुलै २०२६ रोजी असणारे त्यांचे वाढदिवसाचे निमित्ताने मी एक मित्र म्हणून आवर्जुन हा लेख लिहीत असुन, माझ्याकडून व तमाम जनतेकडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!-
लेखन – नरेंद्रसिंह ज.ठाकुर (सोलापुर जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा.भाजपा)