करमाळा प्रतिनिधी

उघड्यावर मांस (चिकन व मटण) विक्री करणारी दुकाने बंद करून नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे यांनी निवेदन दिले आहे. यावेळी सुहास घोलप, श्रीपाद जोशी,जितेश कटारिया उपस्थित होते.

 निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरामध्ये अनेक ठिकाणी चिकन व मटणाची दुकाने उघड्यावर चालविली जात आहेत. या दुकानांमध्ये मांस उघड्यावर ठेवले जात असल्याने दुर्गंधी पसरते, माशा व इतर कीटकांचा तसेच मोकाट कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढतो आणि नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. तसेच अशा प्रकारे उघड्यावर मांस विक्री करणे हे सार्वजनिक स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. शहराची स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक हित लक्षात घेता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी,

उघड्यावर चिकन व मटण विक्री करणाऱ्या सर्व दुकानांवर तात्काळ कारवाई करावी, मांस विक्री केवळ बंदिस्त, स्वच्छ आणि नियमांनुसार परवानाधारक ठिकाणीच करण्याचे आदेश यावेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत.

नगर परिषदेकडून नियमित तपासणी मोहीम राबवून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे व सोलापूर जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *