
सोलापूर, दि. १ जुलै : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन सर, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्माचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, रामचंद्र माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक व शेतकरी गौरव
प्रारंभी आत्माचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी प्रास्ताविकातून कृषी दिनाचे महत्त्व व कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचाही गौरव झाला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष रोप, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान
शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी हितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रगतशील शेतकऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारात योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रमुख व्याख्याते, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी “एल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन, सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन व शाश्वत शेतीबाबत त्यांनी माहिती दिली.
“शेतकरी संपूर्ण देश चालवतो” – अँड. अमृता वाघे
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड. अमृता वाघे म्हणाल्या, “एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार आहे.”
“शेतकरी समृद्ध झाला तरच खरी प्रगती” – दीपक वैद्य
समारोपात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले, “मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील,” असे सांगत त्यांनी कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आत्मा सोलापूरचे अधिकारी-कर्मचारी व जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.