
करमाळा प्रतिनिधी
देवळाली व परिसरात शनिवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही वेळ सुरू असलेल्या या वादळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह फळबागा, भाजीपाला पिके, कांदा आणि काढणीसाठी तयार असलेले उत्पादन जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला, नवीन बांधकाम सुरू असणाऱ्या भिंती जमीनदोस्त झाल्या, घरावरील पत्रे उडून गेले त्यामुळे देवळाली येथील एक नागरिक जखमी झाले आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जोपासलेली पिके या नैसर्गिक आपत्तीमुळे आडवी पडली.

विशेषतः केळी, ऊस, कांदा, भाजीपाला तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
वादळी वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेडनेट, ठिबक सिंचन व्यवस्था तसेच शेतीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या संरचनांचेही नुकसान झाले आहे. यामुळे आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देवळाली गावातील सर्व नुकसानग्रस्त भागाची घटनास्थळी जावून सरपंच व त्यांच्या टीमने पाहणी केली.
