आदिनाथच्या मागील कारभाराबाबत आमनेसामने येऊन डिबेट करण्यासाठी आपण तयार आहोत
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखान्याच्या विषयावर सध्या पाटील व बागल गटात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काल बागल गटाच्या वतीने माजी चेअरमन धनंजय डोंगरे व मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी एका पत्रकार परिषदेत आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टीका केली. या टिकेला पाटील गटाकडून उत्तर देताना गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की, बागल गटाची काल झालेली पत्रकार परिषद ही मुळ विषयाला सोडुन झाली. वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याच्या मागील सतरा वर्षाच्या कारभारावर यात लेखाजोखा मांडला जाईल अशी अपेक्षा असताना त्यावर कोणीही बोलले नाही. आदिनाथ वर कर्जाचा डोंगर उभारण्यात डोंगरे यांचेही शेवटी का होईना योगदान राहिले आहे. आदिनाथ कारखाना व बारामती एग्रो यांच्यातील करार पंधरा वर्षावरुन पंचवीस वर्षावर का करण्यात आला ? बारामती एग्रो बरोबर भाडेपट्टी करार झाला असतानाही त्या विरोधात बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी आदिनाथ वरील आपल्या संचालक मंडळास कोर्टात का लावले ? या दोन प्रश्नांची उत्तरे काल माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली नाहीत. तर मकाई कारखान्यास १४० कोटी रुपये निधी मिळूनही एक गाळप हंगाम का झाला नाही ? जर साखर आयुक्तांना १४० कोटीच्या खर्चाचा तपशील दिला जात असेल तर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी तो एकदाही सभासदांच्या समोर अथवा प्रसिध्दी माध्यमांच्या समोर येऊन सार्वजनिक का केला नाही ? आदिनाथच्या खात्यामधून दिनांक ५ मार्च २०२२ रोजी मकाई कारखान्यासाठी १ कोटी ६० लाख ६५ रुपयांची रक्कम आरटीजीएस (चेक क्रमांक ४०१३) करण्यात आली का ? जर आली असेल तर मकाईस ही रक्कम देण्याचे कारण काय ? याबाबत आदिनाथ व मकाईच्या बागल गटाच्या दोन्ही चेअरमन यांनी खुलासा करावा. आमदार नारायण आबा पाटील हे आदिनाथ कारखान्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी सत्ताधारी नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत सकारात्मक असतानाच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व बागल गटाच्या नेत्या तथा सोलापूर जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीदिदी बागल ह्यांनी आदिनाथ कारखान्यास अगोदर मदत केली तर याचा परिणाम मकाईवर होऊन बागल गटाच्या राजकारणावरही होणार हे ओळखून भाजपाच्या संघटनात्मक कार्यकारिणी मधील वरीष्ठ नेतृत्वांकडे आदिनाथ कारखान्यास अगोदर आर्थिक मदत देऊ नये असे सांगितले. याउलट मकाई कारखान्यासाठी १४० कोटी रुपये मिळाले असले तरी मदतीचे आणखी एक पॅकेज अगोदर देण्यात यावे व आदिनाथचा मदतीचा प्रस्ताव बाजूला सारला जावा यासाठी यशस्वी प्रयत्न केला. आदिनाथच्या मागील कारभाराबाबत आमनेसामने येऊन डिबेट करण्यासाठी आपण तयार आहोत. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी वेळ व ठिकाण ठरवावे असे सांगून पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी बागल गटाचे आव्हान स्विकारल्याचे सांगितले.