
करमाळा प्रतिनिधी
देशाच्या विकासाचा पाया असलेल्या ‘जनगणना’ या राष्ट्रीय कार्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी नुकतेच खातगाव येथील बालचिमुरड्यांच्यावतीने एका बालनाट्याचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. बालकलाकारांनी आपल्या सहज-सुंदर अभिनयातून जनगणनेचे महत्त्व तर पटवून दिलेच, सोबतीला जनगणना करणारे प्रगणक आणि नागरिक यांच्यातील संवाद अत्यंत रंजक पद्धतीने रंगवला.

या बालनाट्यामध्ये प्रगणकांना प्रत्यक्ष कामावर जाताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, जसे की वस्तीवर घराजवळ जातात होणारे कुत्र्याचे आक्रमण याचे हुबेहूब चित्रण करण्यात आले आहे. अनेकदा नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात, संशय व्यक्त करतात किंवा चुकीची माहिती देतात. नाटकात एका दृश्यात नागरिकांच्या मनातील भीती आणि शंका दाखवण्यात आल्या, ज्यावर प्रगणकाची भूमिका करणाऱ्या त्रिवेणी रणसिंग या बालकलाकाराने अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शांतपणे उत्तरे दिली. सातत्याने सर्वांगीण शिक्षणाचा आग्रह धरणारे खातगाव भाग क्रमांक 40 चे प्रगणक बाळासाहेब बोडखे यांनी घर यादी व घर गणना करण्याच्या कामाबाबत जनजागृती करणाऱ्या या बालनाटिकेचे नियोजन केले. यामध्ये त्रिवेणी शंकर रणसिंग, श्रद्धा हरिदास धायगुडे, सई समाधान तानवडे आणि स्वराज बाळासाहेब बोडखे या सगळ्या बालकलाकारांनी नजरेत भरणाऱ्या भूमिकांचे हुबेहूब सादरीकरण केले. कुटुंबाची “जनगणनेची माहिती पूर्णपणे गोपनीय राहते आणि याचा वापर देशाच्या भविष्यातील योजना आखण्यासाठी होतो,” हा संदेश या संवादातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

सध्याच्या काळात राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव बालपणीच निर्माण व्हावी, या उद्देशाने या बालनाट्याची निर्मिती करण्यात आली होती. केवळ कोरडे नियम सांगण्यापेक्षा नाटकातून, संवादातून आणि विनोदाच्या माध्यमातून गंभीर विषय मांडल्यामुळे प्रत्येकाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

”मुलांनी ज्या प्रकारे प्रगणकांच्या समस्या आणि नागरिकांचे शंका-निरसन सादर केले, ते वाखाणण्याजोगे आहे. जनगणना हे केवळ एक सरकारी काम नसून ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हा संदेश या बालनाट्याने प्रत्येकाच्या मनावर बिंबवला.”

खातगावचे प्रगणक बाळासाहेब बोडखे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या बालनाटिकेतून समाजात जनगणनेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केला. गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि.वि.अ. जयवंत नलावडे, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे, निशांत खारगे यांनी या बालनाटिकेतील सर्व कलाकारांचे आणि बोडखे यांचे विशेष कौतुक केले. बालकलाकारांच्या या अनोख्या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.