करमाळा प्रतिनिधी

इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांना अवघ्या ४ किलोमीटर अंतरावरील गावात जाण्यासाठी भिगवण–टेंभुर्णी मार्गाने तब्बल ९० ते १०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी अनेक नागरिक होडीतून प्रवास करतात. मात्र हा प्रवास अत्यंत धोकादायक असून आतापर्यंत ५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयात गोयेगाव (ता. करमाळा) ते आगोती (ता. इंदापूर) तसेच ढोकरी (ता. करमाळा) ते शहा (ता. इंदापूर) दरम्यान पूल बांधण्यासाठी केंद्र शासनाच्या सेतूबंधण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पालखी मार्ग पाहणीसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना ही मागणी करण्यात आली. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात ऊस तसेच विविध फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. त्यामुळे हा परिसर “फ्रूट अँड शुगर बेल्ट” म्हणून ओळखला जातो.

उजनी जलाशय परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असल्याने येथे कृषी पर्यटन, मासेमारी, साखर उद्योग, वनस्पती अभ्यास, नौकाविहार आणि जलपर्यटनाला मोठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आगोती–गोयेगाव तसेच ढोकरी–शहा दरम्यान भीमा नदीवर पूल उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या दोन्ही ठिकाणी भीमा नदीचे पात्र तुलनेने कमी रुंदीचे असून दोन्ही किनाऱ्यांपर्यंत रस्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच येथून पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळच्या अंतरावर आहे. मुख्य नदीपात्रात पूल उभारल्यास या संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने होणे गरजेचे आहे व याच मार्गावरील कवीटगाव येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द व्हावा अशी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांची मागणी असल्याचेही खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *