
करमाळा प्रतिनिधी
पवित्र रमजान ईद आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून, करमाळा शहर विकास आघाडीचे नेते सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग सभापती पूजा इंदलकर यांच्या विशेष प्रयत्नातून शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे शहरातील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता करून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांना प्रार्थनेसाठी सुलभता व्हावी, या हेतूने किल्ला विभागातील नालसाहेब परिसर, फुलसौंदर चौक येथील जामा मशीद, गवंडी गल्ली येथील मशीद, तसेच एस. टी. स्टँड परिसरातील मशीद या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.

तसेच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन असल्याने फंड गल्ली येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. सभापती पूजा इंदलकर यांनी याकामी पुढाकार घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा उचलणे, रस्ते झाडणे इ. कामे करून घेतली.
या स्वच्छता मोहिमेच्या वेळी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली. यामध्ये नगरसेवक रवी जाधव, दादा इंदलकर, पिलू भाऊ इंदलकर, हुमराण मुलाणी, युवा नेते दिग्विजय घोलप, आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी, सागर गायकवाड, शेखर जोगळेकर, चैतन्य पाटील, महेश भागवत उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील बापू सावंत म्हणाले की, शहराचा विकास आणि आरोग्य टिकवण्यासाठी स्वच्छता ही काळाची गरज आहे. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.