भोगवटा वर्ग-२ च्या जमिनींवरील ‘पोटखराबा’ नोंदी दुरुस्त करण्याची युवा संघटक यशपाल कांबळे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा संकटाच्या काळात राज्य शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी लागू केलेली ‘फार्मर आयडी’ची (Farmer ID) जाचक अट तात्काळ रद्द करावी, तसेच संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा संघटक मा. यशपाल कांबळे यांनी करमाळा तहसीलदारांना लेखी निवेदन दिले.

प्रत्यक्ष लागवड असूनही उताऱ्यावर ‘पोटखराबा’; शेतकरी मदतीपासून वंचित!

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना, शेततळे, विहीर अनुदान, सौरपंप, नैसर्गिक आपत्ती भरपाई तसेच महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, करमाळा तालुक्यात ‘भोगवटा वर्ग-२’ मध्ये मोडणाऱ्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र असूनही कागदोपत्री ‘पोटखराबा’ अशी नोंद करण्यात आली आहे.

या तांत्रिक त्रुटीमुळे ऑनलाइन प्रणालीवर लागवडीखालील क्षेत्र ‘शून्य हेक्टर’ दाखवले जात आहे. परिणामी, ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीवर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी निघत नसून हजारो पात्र शेतकरी शासकीय योजना, पीकविमा आणि दुष्काळी नुकसानभरपाईपासून पूर्णपणे वंचित राहत आहेत.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

१. फार्मर आयडीची अट रद्द करा : दुष्काळी परिस्थिती पाहता पंचनाम्यांसाठी फार्मर आयडीची अट तात्काळ शिथिल/रद्द करून सरसकट पंचनामे करावेत.

२. ७/१२ उताऱ्यांची विशेष सुधारणा मोहीम : भोगवटा वर्ग-२ च्या जमिनींवरील लागवडीखालील प्रत्यक्ष क्षेत्राची अचूक नोंद ७/१२ उताऱ्यावर दाखवण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम राबवावी.

३. स्थळपंचनामे करून नोंदणीची संधी : जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शन घेऊन प्रत्यक्ष जमिनीचे स्थळपंचनामे करावेत व शेतकऱ्यांना लागवड क्षेत्राची नोंद करण्याची संधी द्यावी.

४. सुधारित धोरण जाहीर करा : शासनाने वर्ग-२ च्या जमिनींवरील पोटखराबा नोंदींची व्याख्या पुन्हा स्पष्ट करून यासंदर्भात सुस्पष्ट व सुधारित धोरण तात्काळ जाहीर करावे.

या निवेदनाच्या प्रती पक्षाचे राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष संजय (भैय्या) सोनवणे यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) आणि करमाळा पोलीस निरीक्षक यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी आरपीआयचे अमोल कदम यांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव भोसले, तालुका सरचिटणीस रोहित लांडगे, शहराध्यक्ष रणजीत कांबळे, राहुल गायकवाड सर, मयूर कांबळे, आकाश कांबळे, आप्पा कांबळे, रोहित कांबळे, रोहन भोसले,विश्वनाथ भोसले,मारुती मस्तुद,शिवाजी वाघमोडे,विश्वनाथ वाघमोडे,मनोज पवार, विकास तळेकर,सुभाष पानसरे, अमन इनामदार, विकास किरवे, नितीन पोळ, महेश काळे,अमोल उघडे, विठ्ठल कदम,नागनाथ कदम, संजय ताकतोडे,गणेश पवार, धनराज सरोदे,बाबा पोळ आदी जण उपस्थित होते.

……………………

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारणार : यशपाल कांबळे

“भोगवटा वर्ग-२ मधील जमिनींच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. प्रशासनाने राज्य शासनाकडून तातडीने मार्गदर्शन मागवून ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात. शासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवा संघटक यशपाल कांबळे यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed