माझ्या राजकारणाची सुरुवातच स्व. अजितदादांच्या नेतृत्वात झाली होती. घरात वडिलांचे आणि बंधु बबनदादांचे आशिर्वाद आणि पाठबळ होतेच. परंतु एक वरदहस्त लाभलेला आणि स्नेहपुर्ण संबंध कायम जोपासलेले नेतृत्व जे कायम हृदयस्थ होते असे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा आपल्यात नाहीत हे आजही मनाला अजिबात मानवत नाही. आज दादांना जाऊन एक महिन्याचा कालावधी उलटुन गेला. जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुका पार पडल्या आहेत. प्रचाराचे निमित्ताने येतानाच दादांच्या विमानाचा झालेला अपघात आणि आयुष्यातील तो काळाकुट्ट दिवस आयुष्यभरासाठी सल देऊन गेला आहे. दादा माझे वरदहस्त तर होतेच होते परंतु राजकीय पटलावर मला नेहमीच धीरोदत्तपणे प्रत्येक भुमिका जबाबदारीने करण्याचे धाडस देणारे माझे नेते होते. जय-पराजय, यश-अपयश या गोष्टी राजकारणात पचवत कायम लोकसंपर्कात राहुन जनतेच्या कामासाठी सक्रीय राहायचे, जनतेची कामे करायची… सकाळपासुनच सर्व कामांचे नियोजन करून अप टु डेट रहायचे. व्यवसाय असो किंवा राजकारण, समाजकारण त्यासाठी वेळ द्यायचा… आणि आपला प्रत्येक क्षण समाजाशी एकरूप होऊन जगायचे हे सर्व या माझ्या नेत्याची शिकवण. त्यामुळे मी असेल किंवा माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, नेते दादांच्या तालमीत शिकुन तयार झालेले आहेत. अजितदादांच हे अचानक अनाकलनीय जाणे मनाला अजिबात मानत नाही. आमच्या पाठीवर कायम हात ठेवत लढ म्हणुन बळ देणारे आमचे अजितदादा… साखर कारखानदारी किंवा विविध उदयोग, योजनांची सखोलपणे माहिती देत कायम चर्चा करणारे आमचे नेते अजितदादा… सोलापुरला येताना कायम… “संजय मी येतोय उदया… सकाळी लवकरच… थोडा वेळ थांबुन जाईल… मला पुढे जायला ऊशिर नाही होणार म्हणुन थोडा नाश्ता किंवा जेवण करून निघेल पुढे… संजय तु काल परवा कुठली कामे सांगितली बघ… त्याची सर्व माहिती… कागदपत्रे ठेव बोलु आल्यावर तिथे… येतोय मी लवकर उदया…!  हे शब्द ऐकायला नाहीत मिळणार का हो दादा !!…  नगोर्लीच्या फार्म हाऊसवर रुबाबात आणि सांगितलेल्या वेळेवर येणारा दादांचा ताफा आता कधीच येणार नाही… हे आता मनाला मानवत नाही. दादांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जी कधीच भरून येणार नाही. माझ्या पाठीवर कायम कौतुकाची थाप टाकणारे नेते स्व. अजितदादा हे माझ्यासाठी दैवत होते, माझे प्रेरणास्त्रोत होते. आज राज्यातले, देशातले सर्वच लोक प्रचंड हळहळतात, दुःख व्यक्त करतात. मी पण ही दुःखद घटना घडल्यापासुन कायम स्तब्ध होऊन विचार करतोय… आता थांबायच नाही म्हणुन कायम प्रेरणा देणारा प्रेरणास्त्रोत अजितदादा नसले तरी त्यांचे विचार कायमच जिवंत ठेवायचे आहेत. त्यांच्या विचारांचे असंख्य कार्यकर्ते घडवायचे आहेत. त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द… जो दादाचा वादा असायचा तो प्रत्येक शब्द खरा करत सर्वसामान्य जनतेला विकासाच्या वाटेवर घेऊन जायचे आहे. माझ्या सोलापुर जिल्हयातील, करमाळा व माढा तालुक्यातील कार्यकर्त्याला स्व. अजितदादांचे विचार आणि प्रेरणा देऊन कायम हृदयात जपुन ठेवायचे आहे. आपल्याला स्व. अजितदादांच्या विचारांचे आणि विकासाचे राजकारण पुढे नेहण्याचे आहे यासाठी आपल्या सर्वांनाच स्व. अजितदादांना मनामनात जपावे लागेल. त्यांचे विचार आत्मसात करून चालावे लागेल हे नक्की !…. नेते स्व. अजितदादांच्या अनेक स्मृती मनात आहेत… अनेक आठवणी आहेत परंतु मांडणे अशक्य आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मनाला तयार करावे लागतय आणि सहज व्यक्त होताना दुःख दाटलेले आहे, जे आता कायमच राहणार आहे. दादांच्या स्मृती कायमच सोबत राहतील आणि त्यांनी दिलेले प्रेरक विचार मांडत राहु… काम करत आलोय आणि काम करत राहु हा दादांचा मुलमंत्र सर्वजण जपत राहु… हीच स्व. अजितदादांना आदरांजली !!-

मा. आ. संजयमामा विठ्ठलराव शिंदे (करमाळा विधानसभा)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *