
करमाळा प्रतिनिधी
दि. २०/०६/२०२५ रोजी दुपारी ३:३० वा. चे सुमारास फिर्यादी रविंद्र शंकर देशमुख वय ६५ वर्षे व्यवसाय शेती रा.वांगी नं. १ ता. करमाळा जि. सोलापूर हे मोटारसायकलवरून करमाळा ते वांगी नं १ कडे जात असताना खडकेवाडी फाटयाजवळील बिले पेट्रोल पंपाजवळ आले असता चार अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल थांबवून त्यांना ते पोलीस असल्याचे बतावणी करून त्यांना पुढे मर्डर झाला आहे आपले जवळील सोने पिशवीत काढून ठेवा असे सांगून फिर्यादीने त्याचेजवळील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवून वरील चार अनोळखी इसमांनी सोन्याची पिशवी फिर्यादीस फसवुन घेवून मोटारसायक वरून निघून गेले म्हणून त्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून, प्राप्त फुटेजचे अवलोकन करून, अधिक तपास करून आरोपी हे जहीर अब्बास अली शाकूब अली रा. शिवाजीनगर परळी वै. जि. बीड, अली मिर्झा दर्बेश रा. शिवाजीनगर परळी वै. जि. बीड, लाला समीर जाफर शेख रा. आंबीवली कल्याण जि. ठाणे, जाफर आझम सयद रा. आंबीवली कल्याण जि. ठाणे हे नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई सुशीलकुमार पाखरे यांनी नमुद गुन्हयात आरोपीतांना अटक करून आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता नमुद आरोपीतांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे तसेच आरोपीनामे जहीर अब्बास अली शाकुब अली वय ४२ वर्षे यांने फिर्यादीस फसवुन नेलेले मुद्देमालापैकी एक सोन्याची चैन अंदाजे ३ तोळे वजनाची कि.अं. ४,५०,०००/- रू.ची त्याचेकडून हस्तगत केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीत आहेत.