
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. १ शाळेस बँक ऑफ इंडिया शाखा जिंतीच्या वतीने दोन संगणक टेबल भेट देण्यात आले.
शाळा परिवर्तनाचा ध्यास घेऊन काम करत असणाऱ्या या शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभिषण सातपुते यांनी वेगवेगळ्या व्यक्ती तथा संस्थांच्या माध्यमातून शाळेला मदत उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. काही दिवसापूर्वीच या गावातील युवक अमोल धायगुडे यांनी शाळेसाठी दोन संगणक संच भेट दिले होते. परंतु ते ठेवण्यासाठी शाळेत टेबलच उपलब्ध नव्हते. तेव्हा या शिक्षकांनी जिंती येथील बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन तेथील मॅनेजर धम्मानंद डोंगरे यांना शाळेत करत असलेल्या परिवर्तनाबाबत माहिती दिली आणि शाळेस सहकार्य करण्यास विनंती केली.

त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या बँकेने शाळेसाठी उत्कृष्ट दर्जाचे दोन संगणक टेबल उपलब्ध करून दिले. यामध्ये भिगवण येथील चौधरी फर्निचर यांनी देखील विशेष सहकार्य केले. त्यामुळे साहजिकच या शाळेतील विद्यार्थी आता संगणकाचे धडे घेणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आणि अर्थातच राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण करत असलेल्या या पवित्र कार्यात नक्कीच प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे असे मत बँक मॅनेजर डोंगरे यांनी व्यक्त केले.
शाळेला हे संगणक टेबल उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने जिंती बँकेचे मॅनेजर धम्मानंद डोंगरे तसेच सुशांत बुरंगे, दिपक घिगे, महावीर एकाड, सागर शिंदे या सर्व कर्मचाऱ्यांचे बाळासाहेब बोडखे आणि बिभीषण सातपुते आणि सर्व ग्रामस्थांनी शाळेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले.
