
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. २ या शाळेत प्लास्टिक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थक्क करणारे प्लास्टिक गोळा केलेले आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आधी आपल्या स्वतःपासून केली पाहिजे असे सांगत बोडखे यांनी स्वतःच्या घरी देखील गेल्या अनेक वर्षांपासून असे प्लास्टिक संकलन केलेले आहे, शक्य त्या प्लास्टिक पिशव्यांमधून विविध प्रकारची रोपेही तयार केलेली आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष पुरावा दाखवत शाळेतील पालक सभा, माता पालक मेळावा यामधून पालकांना, ग्रामस्थांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याबाबत, बाटलीमध्ये प्लास्टिक बंद करून संकलन करण्याबाबत

वेळोवेळी आवाहन केले आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेत नेहमी सर्वांगीण आणि जीवन शिक्षणावर भर दिलेला आहे. त्यांनी आपले सहकारी शिक्षक किरण जोगदंड यांना सोबत घेऊन सर्वांना सातत्याने आवाहन केले की, शाळेमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच राष्ट्र निर्मितीसाठी जबाबदार नागरिक घडवणे देखील तितकेच गरजेचे आहे, राष्ट्रहिताचा विचार करणारे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अथवा अपरिहार्य कारणामुळे प्लास्टिक घरी आले तर ते पेटून न देता ते बाटल्यांमधून बंदिस्त करणे हा ही एक महत्त्वाचा मार्ग आहे जेणेकरून तो कचरा पर्यावरणात जाणार नाही, गुरांच्या खाण्यातून त्यांच्या पोटात जाणार नाही अथवा पेटवल्यामुळे त्याचा विषारी धूर तयार होणार नाही आणि पर्यावरणावर कसलाही आघात होणार नाही. त्याला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी घरामध्ये जिरे, मोहरी, हळद, तेल, मीठ, अगरबत्ती, शाम्पू, साबण अथवा फळे यांच्या निमित्ताने घरी आलेले प्लास्टिक बाटल्यामध्ये बंदिस्त करण्यास सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर थक्क करणारे प्लास्टिक संकलन केले आहे. एका छोट्याशा गावात छोट्याशा शाळेतील विद्यार्थी मनात आणलं तर एवढं मोठं काम उभा करू शकतात. नक्कीच हा सर्वांसाठी आदर्श आहे.
एवढेच नाही तर कोणतीही वस्तू विकत घेताना विक्रेत्याकडून प्लास्टिक पिशवी न घेता बाजारात जाताना सोबत कापडी पिशवी ठेवावी असेही आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत राबवीत असलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शि.वि.अ. जगताप मॅडम, नितीन कदम, मिनिनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच गावातील समस्त ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व उपशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.