करमाळा प्रतिनिधी  

करमाळा शहर व तालुक्यामध्ये विविध धार्मिक तसेच सामाजिक व राजकीय मिरवणूक व लग्न सोहळ्यामध्ये खुलेआम डीजे वाद्य वाजवण्याची फॅशन सुरू झाली असून ती आता अलीकडे प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण नियम कलम तीन पाच (चार), पाच (पाच) व आठ अनुषंगाने मानवाच्या आरोग्याला तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या, नुकसान करण्याच्या या प्रकारावर तात्काळ बंदी घालून कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामपंचायतिच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अंजना कृष्णा यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी

म्हटले आहे की, आता करमाळा शहर तालुक्यातील संपूर्ण परिसरामध्ये कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये डीजे, लाऊड स्पीकर व लेझर लाईट चा वापर सर्रास सुरू आहे. यामुळे फक्त प्रदूषणच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या डीजेच्या घातक आवाजामुळे अनेकांना हृदयविकाराचे झटके आलेले आहेत व काहींचा जीवही गेलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते खलील मुलानी याचेही गेल्या वर्षी जयंती मध्ये वाजवण्यात आलेल्या डीजे वाद्यामुळे निधन झाल्याची सर्वत्र चर्चा झालेली आहे. तसेच लेझर लाईट मुळे ही कोल्हापूर सहित अनेक शहरातील तरुणाच्या डोळ्यावर परिणाम होऊन अंधत्व आलेले आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमानुसार निवासी क्षेत्र तसेच दवाखाने, शाळा महाविद्यालय या ठिकाणी बिनधास्त कर्णकर्कश आवाजात डिजे वाजवले जातात. ध्वनी प्रदूषण नियमांवर नियंत्रण नियम २००० च्या अनुषंगाने निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल व शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल पेक्षा जास्त आवाजात लावून स्पीकर अथवा डीजे वाद्य वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र या सर्व नियमाची पायमल्ली करण्यात येत असून लहान मुलांच्या बाळाच्या दवाखान्यासमोर तब्बल पाच पाच तास डीजे वाद्य वाजवून त्यांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे प्रकार घडलेले आहेत. याचे गांभीर्य कोणालाही नाही.  त्यामुळे कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा लग्न सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये नियमाचे उल्लंघन करून अधिक आवाजात वाजवणाऱ्या डीजे आयोजक व मालकावर गुन्हे दाखल करून डीजेचे साहित्य जप्त करावे, निवासी व शांतता क्षेत्रामध्ये ध्वनीची तीव्रता मोजणारे यंत्र लावून उल्लंघन करणाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, घरगुती कार्यक्रमासाठी रात्री दहा वाजल्यानंतर लाऊड स्पीकरवर पूर्ण बंदी घालावी. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करावी, तक्रार करण्यास व कारवाई करणे सोपे जावे यासाठी पोलीस प्रशासनाने एक हेल्पलाईन नंबर जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेली आहे. हे निवेदन देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी परदेशी, माजी मुख्याध्यापिका निलिमा पुंडे, मंजिरी जोशी, ललिता वांगडे, प्रा. भीष्माचार्य चांदणे, सेवानिवृत्त कर्मचारी संजय हांडे, ब्रह्मदेव नलवडे, अजीम खान, शिवाजी वीर, चक्रधर पाटील, सुमित परदेशी आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

………………..

नियमाचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार असून नागरिकांनीही पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी सर्व जयंती उत्सवासह सर्वच कार्यक्रम शांततेने व नियमानुसार व कायदेशीरपणे करावेत अन्यथा कडक कारवाई करू : अंजना कृष्णा व्ही.एस उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *