करमाळा प्रतिनिधी
शहरासाठी पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या दहिगाव उपसा केंद्रासाठी नवीन विजपंप खरेदीसाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी १.४० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून युद्धपातळीवर मंजूर करवून घेतला ही वस्तुस्थिती असल्याने यासंदर्भात फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि पेपरबाजी करण्याचा प्रयत्न कोणी करु नये असे प्रतिपादन मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना येवले पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन न.प.पाणीपुरवठा अभियंता शेख यांनी दहिगाव येथील २४० व २०० एच.पी. चे दोन्ही पंप जुने झाल्याने वारंवार नादुरुस्त होणे, जळणे यामुळे शहर पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने ही बाब संजयमामांना सांगा असे मला सांगितल्याने मी शेख यांना त्वरित मामांकडे घेऊन गेलो असता शेख यांचेकडून माहिती घेऊन संजयमामांनी तातडीने मुख्याधिकारी सचिन तपसे, अभियंता आकाश वाघमारे, शेख यांना बोलावून घेऊन आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या व पालिकेचा यासाठीचा १.४० कोटी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडून लगेच मंजूर करवून करवून घेतला. त्यामुळं कोणाची तरी भलावण करण्याच्या उद्देशाने अमक्या-तमक्याच्या सूचनेवरून मामांनी हा निधी मंजूर करवून घेतला असं म्हणणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी लागेल. संजयमामा हे मुळातच विकासाची दृष्टी असलेलं सुजाण, शिक्षित, मितभाषी, लोकाभिमुख असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना कुणाच्याही “शिकवणी”ची गरज पडत नाही हेही सुज्ञ जनतेला ठाऊक आहे. अलीकडच्या काळात आपल्या तालुक्यात कुठल्यातरी मंत्र्याला गाठायचे, त्यांचेबरोबर फोटो काढून काहीबाही निवेदन द्यायचं आणि फोटोसह अमुक-तमुक मागणीचं निवेदन मंत्र्यांना देऊन त्याबाबत चर्चा केली असता मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले वगैरे अशा बातम्या वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करून चमकोगिरी करणाऱ्या बाजारबुनग्या नेत्यांचं तण खूप वाढलंय आणि या प्रकारामुळे जनतेची फुकटची करमणूक होते. दहिगाव पंपिंग केंद्रासाठी मंजूर १.४० कोटी रुपये निधीतून लवकरच विजपंप खरेदीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी संजयमामा शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत असून कोणता नेता विकासाचे व्हिजन असलेला आणि कोणते नेते (?) केवळ ढोलकीपटू हे आता तालुक्यातील जनतेला कळून चुकले आहे असेही यावेळी येवले म्हणाले.