करमाळा प्रतिनिधी

प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्रंथालय व माहितीशास्त्र जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रविण देशमुख होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या उपयोगाबाबत तसेच वाचनसंस्कृती जोपासण्याचे महत्व पटवून दिले. आज ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने प्र. प्राचार्य डॉ. प्रविण देशमुख सरांनी ग्रंथालय कर्मचारी यांचा बुके देऊन सत्कार केला.

प्रास्ताविक ग्रंथपाल अमोल गायकवाड यांनी करताना डॉ. रंगनाथन यांनी मांडलेले पाच मूलभूत ग्रंथालय नियम स्पष्ट केले व त्यांचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले.

या विशेष दिवशी महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वेबसाईटचे, विविध वेबसाईट्सचे क्यू आर कोड (QR Codes) तसेच नवीन आगमन (New Arrivals) फलकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रविण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ही वेबसाईट गुगल साईट्स (Google Sites) च्या माध्यमातून ग्रंथपाल गायकवाड यांनी तयार केली असून, क्यू आर कोडच्या माध्यमातून वाचकांना विविध ऑनलाइन संसाधनांचा त्वरित वापर करता येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व संशोधकांना डिजिटल पद्धतीने ग्रंथालयातील संसाधनांची माहिती मिळविणे, ई-संसाधनांचा वापर करणे आणि ज्ञानसंपत्ती सुलभतेने उपलब्ध होणे शक्य होणार आहे.

तसेच या दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल अमोल गायकवाड यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी ओरिएंटेशन सत्र घेतले. यामध्ये त्यांनी ग्रंथालयातील विविध माहिती स्त्रोतांची ओळख करून दिली, तसेच ग्रंथालयाचे नियम, अटी व सेवांचा उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *