
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.२ या शाळेत इको क्लब ची स्थापना करण्यात येऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांनी एक पेड मॉं के नाम या उपक्रमात सहभाग घेतला आणि आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले. या उपक्रमात शंभर टक्के सहभाग नोंदवणारी करमाळा तालुक्यातील ही पहिली शाळा ठरलेली आहे.

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या “एक पेड मॉं के नाम” या उपक्रमात खातगाव नं.२ शाळेने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने आईच्या सोबत एक झाड लावले. यामुळे गावात, वस्तीवर एवढेच नव्हे तर नदीकाठी राहणाऱ्या मच्छीमारांच्या कोप्यांजवळ सुद्धा झाडे लावली गेली.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या या शाळेत सध्या 38 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमामुळे गावामध्ये 38 नवीन झाडे लावण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी आपले सहकारी शिक्षक किरण जोगदंड यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे या उपक्रमाबाबत प्रबोधन केले, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन किती गरजेचे आहे याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठपुरावा केल्याने या उपक्रमात शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सर्वांगीण शिक्षणासाठी सातत्याने आग्रह धरणाऱ्या या शाळेने पर्यावरण रक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या या उपक्रमात उत्साहाने घेतलेला हा सहभाग नक्कीच इतर सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. यामध्ये करंज, आंबा, चिंच, गुलाब, कढीपत्ता, सिताफळ, चिकू, जांभूळ, नारळ, रामफळ, पेरू, गुलाब, मोगरा, शोभेची झाडे, तुळस अशा विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या केंद्र शासनाच्या या उपक्रमात खातगाव नं.२ शाळेने शंभर टक्के प्रतिसाद नोंदवल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व उपशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले.
…………………
पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमात खातगाव नंबर दोन शाळेने शंभर टक्के प्रतिसाद नोंदवून सर्वांनाच प्रेरणादायी कार्य केलेले आहे. याबद्दल संपूर्ण शाळेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन – जयवंत नलवडे गटशिक्षणाधिकारी करमाळा