

नागपंचमी पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे
मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे मागणी
करमाळा प्रतिनिधी
येत्या २९ जुलै रोजी नागपंचमी निमित्त रावगाव रोड येथील नागोबा मंदिर येथे यात्रा भरते या यात्रेत अनेक भक्त करमाळा शहरातुन दर्शनासाठी येतात विशेषतः महिला वर्गाची विशेष गर्दी असते परंतु या मंदिराकडे जाणारे दोन्ही रस्त्यावर खड्डे पडले असून ते यात्रेपुर्वी बुजविण्यात यावे यासाठी करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना माजी नगरसेवक फारुक जमादार यांनी लेखी निवेदन दिले आहे

जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या २९ जुलै रोजी नागपंचमी निमित्त रावगाव रोड येथील नागोबा मंदिर येथे यात्रा भरते परंतु या मंदिराकडे जाणारे रस्ते किल्ला वेस ते जुना दुर्गा पॅलेस हाॅटेल तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते नागोबा मंदिर ह्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास होणार असून किरकोळ अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे करमाळा नगरपरिषदेने तातडीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे
