करमाळा प्रतिनिधी

केम ढवळस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 14 असून रेल्वे लाइन कि.मी. क्र.359/26, 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी मोठी सुमारे 7 ते 8 गावे असून केम ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी प्रसंगी राज्य सरकारच्या बजेट मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान रेल्वे विभागाने सहकार्याची भूमिका दाखवत त्यांच्या बजेट मधूनच संबंधित भुयारी मार्गासाठी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. आज दिनांक 11 जुलै रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी टीकास्त्र सोडले.

2019 ते 24 या कालावधीत आपण मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून घेतली याच कामांचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार करत असून एकही नवीन काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अद्यापही मंजूर केलेली नाही. उलट मंजूर असलेली विकास कामे बंद करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. एकीकडे दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिकेतून करावे अशी मागणी विधानपरिषद सभागृहांमध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते असलेले आमदार नारायण पाटील मात्र या कामाला विरोध करत आहेत हा विरोधाभास का आहे ?  याचा जाब केम व वडशिवणे ग्रामस्थांनी विचारला पाहिजे. वडशिवणे तलावात पाणी दिले म्हणून डंका पेटवला जातो परंतु त्या तलावाला कायमस्वरूपी

पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपण तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्येच पत्र दिले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिका वितरण प्रणालीतून झाल्यानंतर बचत होणाऱ्या 0.46 टीएमसी पाण्यामधून अतिरिक्त गावांना पाणी देता येईल त्यामध्ये वडशिवणे तलावही आहे. एखाद्या भागाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी लागते .विद्यमान आमदार मात्र वरवरची मलमपट्टी करण्यामध्येच व्यस्त आहेत. मागेल त्याला पाणी देण्याचे धोरण त्यांनी  उन्हाळी आवर्तनात राबविले त्याचा फटका कायमस्वरूपी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या वरकटणे, सरपडोह, सौंदे, साडे या गावांना बसला हे धोरण चुकीचे आहे असाही घनाघात त्यांनी केला. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *