
करमाळा प्रतिनिधी
उजनी बॅकवॉटर परिसरातील तिनही बाजूने साधारण ३० किलोमीटर पाण्याने वेढलेल्या ३५०० एकर कुर्मग्राम (कुगाव), चिखलठाण पंचक्रोशीत पर्यटनाला प्रचंड मोठा वाव आहे. या परिसरातील कुगाव, चिखलठाण १ व चिखलठाण २ या गावातील बेरोजगार युवक-युवतींना गावातच रोजगार उपलब्ध होईल. सदर परिसराचा महाराष्ट्रातील कोकण, भारतातील गोवा किंवा केरळ प्रमाणे विकास करणे गरजेचे होते. याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊले उचलत एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यात कुगाव चा समावेश केला आहे.

भीमामहात्म्य या पौराणिक ग्रंथातील अध्याय ३३ नुसार हनुमानाचा जन्म याच परिसरात झाला असून अध्याय ३३ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी कुगाव येथे भुईकोट किल्ला बांधला होता. सध्या या ठिकाणाला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ साली जलसमाधी लाभली आहे, परंतु उजनी बॅकवॉटर परिसरातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पडतो त्यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देतात. प्रस्तावीत जलहवाई सेवा लवकरच याच परिसरातील कालठण ता. इंदापूर या ठिकाणी सुरू होणार आहे.

हनुमान जन्मभूमीतील बेरोजगार युवकांनी हनुमान जन्मभूमीत येण्यासाठी खाजगी स्तरावर साधारण १२ बोटींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी व पडस्थळ या ठिकाणाहून या परिसरातील येण्यासाठी बोटींगची व्यवस्था आहे. बोटींगच्या माध्यमातून दरवर्षी साधारण दोन कोटी+ च्या आसपास उलाढाल होत आहे. तत्कालीन सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यातुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार दत्तामामा भरणे यांच्या सहकार्यातून मराठवाडय़ाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग शिरसोडी-कुगाव पुलाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अंमलात येणार आहे व याच पुलामुळे येत्या काळात या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व कुगाव पंचक्रोशीतील बेरोजगार युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होइल – धुळाभाऊ कोकरे (मा. संचालक आदिनाथ सह साखर कारखाना)
