करमाळा प्रतिनिधी

      विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये तालुक्याचा प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या कुवतीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये भर टाकतच असतो. करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा शहरासाठी भरघोस निधी मिळवून दिला असल्यामुळे तो विकास भावी आमदारांना पचत नाही. अपचन झाल्यानंतर उलट्यांचा त्रास होणे आपण समजू शकतो, परंतु तालुक्यातील आमदारकीचे स्वप्न डोळ्यापुढे ठेवलेल्या काही मंडळींना मात्र गॅसेसचा त्रास सुरू झाला असून त्यांच्या गॅसेसमुळे शहरासकट तालुक्यामध्ये दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधीमुळे हैराण झालेले मतदार संबंधित भावी आमदारांना त्यांची जागा निश्चितच दाखवतील अशी जळजळीत टीका बोरगावचे मा.सरपंच विनय ननवरे यांनी केली आहे.

       याविषयी अधिक बोलताना ननवरे म्हणाले की, आमदार संजयमामा शिंदे हे मितभाषी आहेत. ते कधीही कुणावर टीका करत नाहीत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा शहरांमध्ये उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी निवासस्थान यासाठी 43 कोटी निधी मधून भव्य अशा इमारती उभ्या राहत आहेत. त्याचबरोबर करमाळा नगरपरिषद करमाळा सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासाठी आलेल्या 10 कोटी निधीचे टेंडर आता प्रसिद्ध होत आहे. याचबरोबर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये जवळपास 15 कोटी निधी त्यांनी दिलेला असून त्याची कामे लवकर सुरू होतील. करमाळा शहराच्या शेजारील देवीचा माळ येथे 4 कोटी निधीमधून मोठ्या प्रमाणावर कामे झालेली आहेत. शहर विकास आराखड्यासाठी 187 कोटीचा निधी प्रस्तावित आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालय एकत्र आणण्याचे दृष्टीने आमदार संजयमामा शिंदे यांनी जवळपास 35 कोटी निधी प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर केला व त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते केले. परंतु या कामांचे श्रेय आमदार शिंदे यांना मिळून द्यायचे नाही अशी अपप्रवृत्ती करमाळा शहरांमध्ये सध्या वाढीला लागलेली असून आमदार शिंदे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरती स्थगिती द्यायची आणि सदर स्थगिती  आपण उठवली म्हणून परत गवगवा करून त्याचे श्रेय लाटायचं असा केविलवाना प्रयत्न भावी आमदार करत आहेत.

        यापूर्वीही करमाळा नगर परिषद कार्यालय, सांस्कृतिक भवन व महाराजांचा पुतळा यावरती अशी स्थगिती संबंधितांनी आणली होती. सध्याही तहसील कार्यालय इमारत बांधकामावरती स्थगिती आणण्याची भाषा ते बोलत आहेत. करमाळा तहसील कार्यालयाची इमारत शहरातच हवी ही आमदार संजयमामा शिंदे यांची भूमिका कायम आहे. परंतु अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यापासून जवळपास 4 महिन्यांमध्ये अद्यापही तहसील कार्यालय आणि त्याच्या परिसरामध्ये कुठेही शासकीय जागा उपलब्ध होत नाहीत, ज्या जागा आहेत त्याचे वाटप झालेले आहे किंवा त्या ठिकाणी कार्यरत किंवा जीर्ण अवस्थेतील इमारती आहेत. अशा परिस्थितीमध्ये भूमी अभिलेख कार्यालय, तहसील कार्यालय यांना वारंवार सूचना करून अनेक बैठका लावूनही जागाच उपलब्ध होत नाही त्यामुळे आलेला निधी परत जाऊ नये याच भूमिकेतून आमदार संजयमामा शिंदे यांनी बायपास लगत असलेल्या शासकीय खुल्या जागेत प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. यामध्ये गैर वाटण्यासारखं काहीच नाही असे असताना अगदी खालच्या स्तरावरती जाऊन भावी आमदार टीका करत आहेत हे चुकीचे आहे. या प्रवृत्तीच्या विरोधकांना मतदार त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील अशी जळजळीत टीका विनय ननवरे यांनी केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *