
करमाळा प्रतिनिधी
सध्या रस्त्याने जातांना रानावनात आग लागून पेटल्या सारखी ही झाडे नजरेत भरत आहेत ती पळसाची झाडे!

मधमाश्यांना,भ्रमरांना आकर्षित करण्यासाठी केशरी निखारे पांघरून सजल्या सारखे हे पलाश किती मोहक वाटत आहेत??
सध्या शिशिर ऋतू सुरू आहे, वातावरणात उष्णता उतरत आहे, अशा शिशिरात पानगळीचा ऋतू सुरू होतो, वसंतात नवी पालवी फुटण्याच्या अगोदरची ही पानगळीची आवस्था असते.

ह्या काळात रानावनात हिंडताना एक वेगळीच हुरहूर मनाला जाणवते, कोरडा शुष्क वारा वाहतो डोक्यावर वाळलेली पाने भिंगऱ्या सारखी येऊन पडू लागतात, हिरवळ ओसरून झाडे निष्पर्न उदास दिसू लागतात. त्यांच्या लाकडी सांगाड्यातुन

दूरवरचे शिवार स्पष्ट मोकळे दिसू लागते, एरवी डोळांनी न दिसणारे अनेक लाजरे बुजरे पक्षी अशा बोडक्या झाडांवर उघडे पडतात.

अश्या पानगळीच्या वातावरणात हे पळस मात्र आपल्या सौंदर्याच्या परमोच्च शिखरावर असतात, निष्पर्ण होऊन ही आगी सारख्या केशरी मोहराने उन्मत झालेले…

वृक्षमित्र :- काका काकडे दादाश्री फाऊंडेशन,वीट ९५२७३२७३००
