जेआरडी माझा

शिक्षण व्यवस्था दोषी आहे शिक्षक नाही अशी माहिती सोलापूर शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड सर यांनी दिली आहे.

प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे मूल्यमापन करत असताना सातत्याने शिक्षकांना दोष दिला जातो. प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा वयोगट व शासनाने निर्धारित केलेला अभ्यास याचा विचार केल्यास त्या मुलांना शिकवणारा शिक्षक हा

अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी सक्षम आहे. शिक्षण तज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम अत्यंत आदर्श आहे. हा अभ्यास व कौशल्य प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्यास विद्यार्थी त्याच्या पुढील जीवनात सातत्याने प्रगती करीत राहील.

आज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान प्रकर्षाने जाणवते. समाजाकडून यासाठी शिक्षकांना दोष दिला जातो. समाजाला शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक दिसतो आणि समाजाच्या त्या शिक्षकाकडून अपेक्षा असतात.

समाजाला शिक्षण व्यवस्था म्हणजे काय याची कल्पना नसते. आपल्याकडे जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था आज दुर्दैवाने इतर प्रशासकीय कार्यालया प्रमाणे काम करत आहे. शिक्षण व्यवस्थेतील शेवटचा घटक विद्यार्थी हा नेहमीच

शिक्षणापासून वंचित राहिला जातोय याकडे व्यवस्थेचे लक्ष नाही याचे नवल वाटते. या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण व्यवस्था कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हा शाळा स्तरावर राबणारा आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया पार

पाडणारा घटक आहे. शालेय स्तरावर विद्यार्थी व शिक्षक हे एकत्र असणे म्हणजेच शिक्षण प्रक्रिया पूर्ण होणे होय. ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देऊन त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांचे कौशल्य विकसित करतील व विद्यार्थ्यांचा विकास घडवतील त्याचवेळी शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल. दुर्दैवाने आज शिक्षण व्यवस्था ही शिक्षक आणि मुलांना एकत्र येण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही. आज शिक्षण व्यवस्थेतील वरिष्ठ कार्यालये शिक्षकावर अनेक प्रकारच्या परिपत्रकांचा व उपक्रमांचा भडीमार करताना दिसतात. शासनाच्या विविध मंत्रालयांनी वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळे उपक्रम मांडले की त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षकावर येते. वेगवेगळ्या प्रकारचे दिन साजरे करताना शिक्षकांना त्या दिनविशेषणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यापेक्षा संबंधित केलेल्या कामकाजाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याची धास्ती मनात जास्त असते.

शिक्षकाकडून नियमितपणे अनेक प्रकारचे ऑनलाईन काम करण्याची शिक्षण व्यवस्थेची अपेक्षा आहे. शासनाचे विविध उपक्रम राबवल्याचे अहवाल ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागतात. फोटो, व्हिडिओ तयार करून पाठवावे लागतात. वेगवेगळी परिपत्रके लिहून केंद्रप्रमुखांकडे जमा करावी लागतात. अनेक प्रकारच्या स्पर्धा अगदी एका दिवसात पार पाडाव्या लागतात. हे सगळे कागदोपत्रे काम करत असताना शिक्षकाला विद्यार्थ्यांसाठी द्यायला वेळच नसतो. शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शिक्षक हा कर्मचारी असल्याने शासनाच्या हुकूमाची अंमलबजावणी त्याला करावी लागते.

अशा अनेक कारणांचा परिणाम म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारा वेळ एकमेकांसोबत घालू शकत नाहीत. शिक्षक शिक्षण व्यवस्थेच्या विविध अपेक्षा पूर्ण करताना विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकत नाही. या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त असणारे सर्व अधिकारी हे शिक्षकाकडून कागदोपत्री कामाची अपेक्षा करतात. व्यवस्थेतील अधिकारी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना दिसून येत नाही. जर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला महत्त्व द्यायचे असेल तर अगोदर शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ दिला पाहिजे. कागदोपत्री कामातून शिक्षकाची मुक्तता केली पाहिजे. आज शाळा तपासण्या ज्यावेळी होतात त्यावेळी वरिष्ठ अधिकारी शाळेतील कागदपत्रे, अहवाल, केलेले उपक्रम यांच्या फाईल्स पाहतात. खरे पाहता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची गुणवत्ता काय आहे हे पाहण्यामध्ये अधिकाऱ्यांना अधिक रस असला पाहिजे. शिक्षकांकडून कागदपत्रांच्या पूर्ततेची अपेक्षा करण्यापेक्षा विद्यार्थी घडवण्याची अपेक्षा करणे हे व्यवस्थेचे प्रमुख कर्तव्य आहे. त्या दृष्टीने व्यवस्थेने शिक्षकांना कागदोपत्री कामातून मुक्त करून विद्यार्थी घडविण्यावर भर देणे विषयी सूचना करावयास हव्यात. ज्यावेळी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी शाळांना भेटी देतील त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणी केली पाहिजे. जर त्या शाळेचे विद्यार्थी त्यांच्या वयोगटाप्रमाणे शिक्षण संपादन करत असतील तर त्या शाळेच्या शिक्षकांचा गौरव केला पाहिजे. शाळेच्या कामकाजाचे यश अपयश विद्यार्थ्यांमध्ये पाहिले पाहिजे. जर शिक्षकांनी विद्यार्थी घडवून दाखविले असतील तर अशा शिक्षकांकडून कागदोपत्री कामे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यवस्थेने करू नये. एक वेळ कागदोपत्री कामे मागे ठेवली तरी चालतील पण विद्यार्थी घडवा असे म्हणणारी शिक्षण व्यवस्था ज्या दिवशी तयार होईल त्याचवेळी खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचावेल. म्हणून आजच्या प्राथमिक शिक्षणाच्या निराशा जनक स्थितीला शिक्षकांना जबाबदार धरण्यात येऊ नये तर प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागासलेपणाचा दोष हा व्यवस्थेवर ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सक्षम आहे परंतु शिक्षकाला गुरूचा दर्जा दिला पाहिजे. शिक्षकांकडून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय कागदपत्रे रंगवण्याची अपेक्षा ठेवणारी व्यवस्था तात्काळ बंद झाली पाहिजे.

शिक्षकांना मुलांना शिकवायला वेळ द्या आणि हा वेळ देऊन नंतर शाळांचे मूल्यमापन करा. अशा शाळांच्या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळा आणि मग शिक्षण व्यवस्थेच्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक अपयशाचे खरे कारण शिक्षण व्यवस्था होती शिक्षक नव्हते, असे विजयकुमार गुंड सर जिल्हा प्रवक्ता शिक्षक भारती संघटना सोलापूर यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *