नवीन उद्योजकांसाठी कर्ज अर्जाचे फॉर्म अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध

करमाळा प्रतिनिधी
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी आज पुणे येथील परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची भेट घेत समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी समाजातील युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान नवउद्योजकांना उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केले.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनाही उपलब्ध असून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील होतकरू युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा महामंडळाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या भेटीदरम्यान भारत घुगीकर काका साडे, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, ज्या नवीन उद्योजकांना कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज व माहितीपत्रके अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधून योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेमार्फत करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.