
करमाळा प्रतिनिधी
टेम्भुर्णी-जातेगाव महामार्गाला मिळालेली मंजुरी ही आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळेच मिळालेली आहे हे सर्वश्रुत असताना, या कामाला आमच्यामुळेच परवानगी मिळाली असा डांगोरा पिटून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न हा निव्वळ हास्यास्पदच नव्हे तर केविलवाणा असल्याचे प्रतिपादन संजयमामांचे समर्थक, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केले आहे.



याविषयी बोलताना येवले हे पुढे म्हणाले, नगर ते पंढरपूर या महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी व पाठपुरावा संजयमामांनी जि.प. अध्यक्ष असतानापासूनच सुरू केलेला होता. याबाबत दि. १७ ऑगस्ट व १४ डिसेंबर २०१७ ला जि.प. अध्यक्ष या नात्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या महामार्गाचे काम त्वरित सुरू करावे अशी


मागणी पत्रांद्वारे केली होती. नंतर आमदार या नात्याने मविआ सरकारच्या काळात दि. २८ जानेवारी २०२०, १० सप्टेंबर २०२१ व ६ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे नगर-टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५१६-अ चा जातेगाव ते टेंभुर्णी हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे हस्तांतरण करणे, याबाबत ना हरकत

प्रमाणपत्र देण्याकामी बैठक लावण्याची मागणी पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे केलेली होती. आमदार शिंदे यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी आमदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव, सचिव (रस्ते), उपसचिव (रस्ते), मुख्य अभियंता, संबंधित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या महामार्गाचा विषय मार्गी लावण्यात आला होता आणि आता दि. ११ डिसेंबर रोजी याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे.

२०१० साली जातेगाव- टेंभुर्णी या रस्त्याचा प्रकल्प शासनाला सादर करण्यात आल्यानंतर २०१२ साली सोलापूर बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपनीला प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश दिला होता. सदर कंपनीने ६१ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यापैकी २५ कि.मी. लांबीचे हे काम अंशतः पूर्ण केले आणि २०१५ पासून हे काम पूर्णपणे बंद ठेवले. हे काम सुरू असताना आपल्या तालुक्यातील कोणकोणत्या लोकप्रतिनिधींनी, पुढाऱ्यांनी ठिकठिकाणी या कंपनीचे काम अडवून कंपनीकडून लाखोंची खंडणी वसूल केल्यानेच हे काम बंद पडले हे आता फुकटचे श्रेय लाटू पहाणाऱ्या फुकट्याना ठाऊक नाही काय ? सात वर्षे बंद असलेले हे काम मध्यंतरी आमदार संजयमामांच्या पुढाकार व प्रयत्नांमुळे सुप्रीम कंपनीकडून काढून कल्याणी कंपनीस देण्यात आले होते, परंतु सुप्रीम कंपनी न्यायालयात गेल्यामुळे काम होऊ शकले नव्हते. आता मात्र संजयमामांमुळेच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून या महामार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा फुकटचे श्रेय घेणाऱ्या मंडळींनी आधी आपली औकात लक्षात घ्यावी, आपले कार्यकर्तुत्व काय, जनमानसात आपली लायकी काय, आपले धंदे काय याबाबत आत्मपरीक्षण करावे कारण जनतेने त्यांचे योग्य ते परीक्षण वेळोवेळी करून लायकी दाखवलेली आहेच ! असा सल्ला येवले यांनी दिला आहे.