
करमाळा प्रतिनिधी
आज दिनांक २९/०९/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते शरदचंद्रजी पवार यांच्या परवानगीने सकाळी ठीक ०९:०० वा. त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी शिक्षण व आरक्षण याबाबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात आली. शिवनगर विद्या प्रसारक मंडळ मालेगाव चे सचिव प्रमोद शिंदे सर उपस्थित होते.

शिक्षणाबाबतीत खालील ०२ मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली.
१) प्रवेश प्रक्रिया :- मागील काळातील लॉक डाऊन मधील म्हणजेच २०२०-२१ मध्ये शरदचंद्रजी पवार यांनी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी कडक लॉक डाऊन असताना सुद्धा शिक्षण विषयक शिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव शिक्षण विभाग, संचालक, आयुक्त, संस्थाचालक यांची बैठक आयोजित करून त्यामध्ये अभियांत्रिकी व औषध निर्माण या अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता इतर राज्यांप्रमाणे करण्याबाबत संबंधितांना सांगून, त्यामध्ये बदल करण्यात आला व त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला. परंतु प्रवेशाबाबतचे इतर विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये इयत्ता बारावी नंतर च्या सर्व खाजगी विद्यापीठे व इतर महाविद्यालयांसाठी प्रवेशाची अंतिम तारीख एकच करणे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करणे प्रवेश परीक्षांची संख्या कमी करणे, समुपदेशन फेरी पुन्हा सुरू करणे इ. बाबत सखोल चर्चा करण्यात आली.

२) शिष्यवृत्ती :- महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक व आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत दिली जाते, सदरचे शुल्क, शासन संबंधित महाविद्यालयांना देत असते. परंतु मागील १०-१२ वर्षांपासून सदरचे शुल्क देण्यामध्ये शासनाची दिरंगाई होत असल्याने संस्थांना बँकांची देणे, सरकारचे कर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट, पाणी, इंटरनेट व इतर मेंटेनन्स ची बिले वेळेत देण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, बहुजन समाज कल्याण विभाग व इतर अन्य विभागांची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची मागणी करण्यात आली.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असणारी स्वयंम व स्वधार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिक महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व धनगर या समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम व स्वधार योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार यांना वारंवार मागणी केलेली आहे. परंतु सदरचे आरक्षण न मिळाल्याने समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून सध्या आरक्षण मिळेपर्यंत इतर समाज बांधवांप्रमाणे आरक्षणाशिवाय मराठा समाजाला देता येऊ शकणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलतींच्या बाबतीत विविध मुद्द्यांद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रा. रामदास झोळ, मंगेश चिवटे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहावरती पुनर्परवानगीने मीटिंग लावून मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती शरदचंद्रजी पवार यांना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आली. त्याचबरोबर इतर समाज बांधवांप्रमाणे आरक्षणाशिवाय मराठा समाजातील युवकांना देता येऊ शकणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती बाबत चर्चा करण्यात आली.