करमाळा प्रतिनिधी

संस्थेच्या हिताचा (म्हणे !) विचार करून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अकलूजला जाऊन विचार-विनिमय करून अखेर जागावाटपाचा निर्णय सर्वानुमते झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ज्या बाजार समितीच्या सन २००० आणि २०१८ च्या निवडणुकीमध्ये सत्तेसाठी ज्यांनी एकमेकांचे रक्त सांडले,एकमेकांशी टोकाची दुष्मनी केली त्यांनाच अचानक संस्थेच्या हिताची उपरती कशी काय झाली ? याचा अर्थ न कळण्याइतपत या तालुक्यातील जनता आता दूधखुळी राहिलेली आहे असा जर कोणाचा समज असेल तर ते ” मु…च्या ” नंदनवनात वावरत आहेत ! असे म्हणावे लागेल.कारण केवळ सहकारी संस्थांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य द्यायचे हीच जर प्रामाणिक भूमिका जर असेल तर मग याआधी एखादा अपवाद वगळला तर बाजार समिती जाऊद्या पण आदिनाथ,मकाई या शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध अथवा सामंजस्याने कधी का नाही पार पडल्या ? खरं तर आदिनाथ व मकाई हे कारखाने सभासद-शेतकऱ्यांच्या मालकीचे असताना या कारखान्यांची कोणाकोणाच्या करणीने पुरती ‘ वाट ‘ लागली हे या तालुक्याला ठाऊक नाहीये का ? आदिनाथचे ” हित ” जपण्यामध्ये सगळ्यांनीच कमीअधिक प्रमाणात हातभार लावलेला आहे आणि मकाईचे ” हित ” सुरुवातीपासून कोणी  जीवापाड जपले व अजूनही ही “जपणूक ” सुरूच असल्याचे जगजाहीर आहे.

आणि या पार्श्वभूमीवर आता बाजार समितीचा इतका कळवळा कशामुळे आला,पुतना मावशीला इतका पान्हा कसा आणि का फुटला हेही लक्षात घ्यायला हवं ! तसं पाहिलं तर बाजार समितीची निवडणूक ही सामंजस्याने व्हावी यासाठी पहिलं पाऊल टाकलं ते आमदार संजयमामा यांनीच! गत विधानसभा निवडणुकीपासून जयवंतराव हे मामांच्या सोबत आहेत आणि त्यांचा योग्य तो राजकीय रिस्पेक्ट मामांनी सांभाळलेला आहे.या राजकीय युतीमुळे बाजार समितीच्या काही जागा आपल्या समर्थक-कार्यकर्त्यांसाठी मागणे व घेणे यात अवाजवी काहीच ठरले नसते.आणि मामांच्या बऱ्याच समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केले होते,असे असताना मामांनी आपल्या कार्यकर्त्यांचे अर्ज माघारी घेऊन मामांनी सामंजस्याची वाट अधोरेखित केली आणि त्यानंतरच अकलूज दर”बारी” जागावाटपाचा करार ( की तह?) ठरला.त्यानुसार मांगीकरांना दोन आणि लव्हेकरांना दोन जागा देण्याचे ठरले म्हणे ! असो…

   खरं म्हणजे या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी जगताप गटाच्या व्यापारी मतदारसंघातील दोन जागा नेहमीप्रमाणे बिनविरोध झालेल्या आहेत,सोसायटी मतदारसंघात जगताप व आमदार मामांचे निश्चितच वर्चस्व आहे आणि सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ह्या मामासमर्थकांच्या ताब्यात आहेत तसेच बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये जगताप समर्थक मतदार आहेतच.मामांची अभ्यासू कार्यशैली,जनसंपर्क,विकासाभिमुख                          

दृष्टिकोन आणि येणारा माणूस कोण,कुठल्या गटाचा असल्या संकुचित राजकारणाला फाटा देऊन त्याचे वैयक्तिक अथवा सार्वजनिक तसेच विकासाची कामे मार्गी लावण्याची असलेली हातोटी, मुद्देसूद आणि विधायक बोलणे या नेतृत्वगुणांमुळे आजमितीला मामांचा राजकीय गट हा तालुक्यात सर्वात प्रभावी ठरलेला आहे हे त्यांच्या राजकीय विरोधकांना देखील (नाईलाजाने का होईना) मान्य करावेच लागेल.

त्यामुळे निवडणूक झाली असती आणि सर्व विरोधक एकत्र एकवटले असते तरी मामांच्या पाठबळावर जगताप गटाचा विजय हा निश्चितच झाला असता.शिवाय हमाल मतदार संघातून बिनविरोध झालेला प्रतिनिधी हा सावंत समर्थक असल्याने व सावंत हे मामा समर्थक असल्याने त्याबाबत देखील काही अडचण असण्याचे कारण नव्हते.

    असे सगळे अनुकूल वातावरण असताना, मामांची बिनशर्त ताकद पाठीशी असताना कळीचा मुद्दा हा आहे की,विरोधकांना चार जागा का सोडल्या ? आणि हे करूनदेखील जर एखाद्या जरी अपक्ष वा हटवादी उमेदवाराने आपला अर्ज कायम ठेवला तर निवडणूक बिनविरोध होईल का ? आणि असे जर झाले तर संस्थेचा निवडणूक प्रक्रियेचा खर्च वाचवून संस्थेचे हित साधले असा आणलेला आव निव्वळ फुसकाच ठरणार ना !

मागील विधानसभा निवडणुकीत जयवंतरावांनी केलेली मदत लक्षात ठेवून मामांनी त्यांची संस्था पुन्हा त्यांच्याच हातात यावी या प्रांजळ हेतूने सर्वप्रथम भूमिका घेतली. पण या निवडणुकीत बागल व पाटील एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी अशी खलबते अकलूजला सुरू असताना अचानक वारे का आणि कशामुळे फिरलं ?

आणि संस्थेच्या हिताची उपरती एकाच वेळी सगळ्यांना कशी काय सुचली ?

    येणारी लोकसभा निवडणूक माढ्यातून भाजपकडून लढविण्यासाठी अकलूजकर इच्छुक आहेत आणि त्यामुळे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि अकलूजकरांमध्ये ‘ शीत-युद्ध ‘ पेटलेले असल्याने आणि अलीकडेच राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा झालेल्या बदलामुळे आमदार शिंदे-बंधूंची ताकद आपल्याविरुद्ध उभी राहणार हे गृहीत धरून करमाळ्यातून शिंदे विरोधकांचे समर्थन मिळावे आणि त्याचबरोबर जयवंतराव निदान लोकसभेपुरते तरी आपल्या पाठीशी यावेत…कदाचित या हेतूने जयवंतरावा ना चुचकारण्याचा हेतू असावा आणि आपण एकत्र आलो तरी शिंदे-जगताप यांच्यापुढे बाजार समिती निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही हे ठाऊक असल्याने व पुढील राजकारणात अकलूजकरांची आपल्याला मदत होऊ शकेल आणि न जाणो…कदाचित येत्या विधानसभा निवडणुकीत जयवंतरावांचे आपल्याला समर्थन मिळू शकेल या आशेपोटी बागल-पाटील यांनी तडजोड मान्य करून दोन-दोन जागा पदरात पाडून घेतल्या असाव्यात !

असो…या निमित्ताने या तालुक्यातील नेतेमंडळींची संधीसाधू व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती, सत्तेची आणि घराणेशाहीची मक्तेदारी कायम टिकविण्यासाठी सुरू असलेली नितिशून्य धडपड… त्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडी, आघाड्या आणि संधी साधली की केली जाणारी शब्दांची फिरवाफिरवी, त्यातून होणाऱ्या बिघाड्या पुन्हा एकदा जनतेसमोर ठळकपणे उघड झाल्या आहेत. आणि गंमत म्हणजे संस्थामधली मक्तेदारी टिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडी,स्वार्थी राजकारणापायी या संस्थाचे केलेले वाटोळे अशा कुठल्याच बेसलेस राजकारणाशी मामा आमदार असूनसुद्धा त्यांचा काडीमात्र संबंध नाहीये. त्यामुळे या निमित्ताने तालुक्यातील सुज्ञ जनतेच्या दृष्टीने मामांच्या कृतिशील नेतृत्वाचे वेगळेपण आणखीनच ठळक आणि उठावदार ठरलंय हे मात्र नक्की !

– तिरंदाज करमाळाकर

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *