
करमाळा प्रतिनिधी
पुनवर ता. करमाळा येथील शेतकरी राजेंद्र नरसाळे यांच्या ऊ. वडगाव येथील शेतात 19/9/2023 रोजी सकाळी 10:30 वा. शेतामध्ये जनावरांसाठी ऊस तोडत असताना बिबट्याने हल्ला केला. वंचित बहुजन आघाडी करमाळा यांनी राजेंद्र नरसाळे यांना पुनवर येथे घरी

जाऊन भेट दिली असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. ते ऊस तोडत असताना बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला लवणी मध्ये बिबट्याने चावा घेतला व त्यांना उसामध्ये ओढून येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस

हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यावर बिबट्या जरा लांब गेला, तो लांब जाऊन एकटक त्यांच्याकडे पाहत होता. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला व प्रसंगावधान साधून काही अंतरावर जाऊन

नातेवाईक व शेजाऱ्यांना फोन केला. नातेवाईकांनी त्यांना जाधव पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले व उपचारानंतर लस घेण्यासाठी सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे पाठवले. सोलापूर लस घेतल्यानंतर आता त्यांना त्यांच्या घरी आणले आहे. प्रत्यक्षात भेटल्यावर त्यांना पाहून त्यांची परिस्थिती लक्षात आली. स्वभावानी ते गरीब आहेत, आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. तरी वन विभागाने शासकीय मदत जाहीर करावी व करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक विलास कांबळे, करमाळा तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे सर, करमाळा तालुका महासचिव प्रा. नंदू कांबळे, करमाळा शहराध्यक्ष विशाल लोंढे यांनी केली आहे