जनसंवाद साधण्यात व्यस्त पत्रकारांचा मनसंवाद हरवून गेला आहे – अरविंद जोशी

करमाळा प्रतिनिधी

सतत जनसंवाद साधण्यात व्यस्त राहणाऱ्या पत्रकारांचा स्वतःचा स्वतःशी हरवलेला मनसंवाद साधला पाहिजे व पत्रकारितेत कितीही स्थित्यंतरे आली तरी जनजागृतीव्दारे राष्ट्रीय हित, राष्ट्राची अखंडता व सामाजिक एकता जोपासण्यासाठी त्यांनी योगदान दिले पाहिजे असे विचार ज्येष्ठ पत्रकार व दै. तरुण भारत सोलापूरचे माजी संपादक अरविंद जोशी यांनी कुर्डुवाडी येथील माध्यम संवाद परिषदेत व्यक्त केले.

विश्व संवाद केंद्र पुणे आणि हिंदू धर्म रक्षक कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्डूवाडी नजिक लांडे फार्म येथे आयोजित सदर परिषदेमध्ये आपल्या मार्गदर्शनात जोशी यांनी पत्रकारितेतील स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत झालेले बदल, सध्या अभिव्यक्तीसाठी प्रत्येकाला सहज उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या महापुरात धूसर होत चाललेले मुद्रित मीडियाचे भवितव्य, संवादाचे प्रकार, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी आदिंवर सखोल मार्गदर्शन केले.

जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, अरविंद जोशी यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पूजनाने या परिषदेचे उद्घाटन झाले. ॲड. महेश वाळूजकर यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय केला. सिध्देश्वर डोके यांनी प्रास्ताविक तर पत्रकार वासुदेव जोशी (मंगळवेढा) यांनी सूत्रसंचालन केले. संपादक जयंत दळवी (करमाळा) यांनी आभार मानले. या परिषदेच्या यशस्वितेसाठी ॲड. महेश वाळूजकर व हिंदू धर्म रक्षक कुर्डूवाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. डॉ. स्वानंद कुलकर्णी सरांच्या पसायदानाने परिषदेची सांगता झाली. भोजनोत्तर कार्यक्रम संपला. या परिषदेस करमाळा, माढा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील ४२ जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *