
करमाळा प्रतिनिधी
शेटफळ तालुका करमाळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा गेली वीस वर्षांपासून दिमाखात उभा होता. मात्र काही कारणास्तव हा पुतळा खराब झाल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी एकजुटीने एकत्रित येऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला.

मात्र पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन गावकऱ्यांना हा पुतळा काढून टाका नाहीतर गुन्हे दाखल करू अशी दमदाटी करत असल्यामुळे शिवप्रेमी संतापाची लाट उसळली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात छत्रपतींचा पुतळा उभा करण्यास आडकाठी आणली जात असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवभक्तातून उठत आहे.

नागोबाची शेटफळ येथील मंदिर संस्थांच्या जागेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गेली वीस वर्षापासून पुतळा होता या ठिकाणी दर्शनासाठी रोज शिवभक्त येत होते. या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. पण हा पुतळा उघड्यावर असल्यामुळे पुतळ्याला तडे गेले. त्यामुळे सर्व शिवभक्तांनी एकत्रित येऊन त्याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे.

मात्र आता प्रशासनाने या पुतळ्याची जबाबदारी घ्या असे सांगत हा पुतळा काढून घ्या अन्यथा कारवाई करू अशी लिखी पत्र गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना दिले आहे.

दुसरीकडे गावकऱ्यांनी मात्र रक्त सांडले तरी चालेल माघार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी मोठा संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शांतता असताना सर्व समाज एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असताना कारण प्रशासन हस्तक्षेप करून गावात शांतता पुसरीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे
……………………
विकास संदिपान गुंड, सरपंच शेटफळ
गेली वीस वर्षांपासून या जागी पुतळा होता त्याच जागी युवकांनी पुतळा उभा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत गावातील कोणाचीही तक्रार नाही असे असताना प्रशासन करत असलेली कारवाई गावकऱ्यांना मान्य नाही. भावनेचा विचार करून प्रशासनाने तोडगा काढावा.
……………………..
नितीन खटके, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मात्र छत्रपतींच्या पुतळ्याला प्रशासकीय अधिकारी अडकाठी आणत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी यांनी योग्य ती कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा.
…………………….
महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना
याबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर वस्तुस्थितीचा मेल केलेला आहे. मंत्री कार्यालयाकडून योग्य ते सूचना प्रशासनाला येऊन सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळा काढण्याची भूमिका बदलावी.
…………………….
विजय जाधव तहसीलदार करमाळा
सदर पुतळ्या संदर्भात उप विभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार पुतळा काढण्यासंदर्भात लेखी पत्र सरपंचांना ग्रामसेवकांना दिले आहे.
………………………………….
दादासाहेब लबडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्या संदर्भात ग्रामसभा झाली असून या ग्रामसभेत सर्व नागरिकांनी एक मुखाने पुतळा उभा करण्यास सहमती दर्शविलेली आहे.