
खातगाव नं.2 शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 या शाळेत इयत्ता पहिलीसाठीचा शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नेहमी आग्रह धरणाऱ्या खातगाव नं.2 या शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शा. व्य. स.चे अध्यक्ष,

उपाध्यक्ष तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी सात वेगवेगळे टेबल लावण्यात आले होते. यामध्ये नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पुर्वतयारी आणि मार्गदर्शन व समुपदेशन असे वेगवेगळे सात टेबल लावण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे आनंददायी आणि कृतीयुक्त तसेच खेळातून शिक्षण देत शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी,

शाळेविषयीची भीती मनातून नाहीशी व्हावी, यासाठी मोठ्या उत्साहाने प्रयत्न करण्यात आले. या मेळाव्यामध्ये महिलावर्ग, पालक वर्ग तसेच गावातील युवा वर्ग यांनी विशेष सहभाग नोंदवला. बालचमुंनी वेगवेगळ्या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला.

शाळा पूर्वतयारी पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना आपण कसे शिक्षण प्रवाहात आणू शकतो तसेच त्यांच्या मनातून शिक्षणाविषयीची भीती कशी घालू शकतो. याबाबत शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी या मेळाव्यांमध्ये उत्साहाने सहभाग घेत उपस्थितांना प्रोत्साहन दिले.
दोन शिक्षकी शाळा असून देखील नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संपत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा अविनाश मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे तसेच सर्व ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले..