
खातगाव नं. 2 शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…
करमाळा :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ सुवर्णा अविनाश मोरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दादा झेंडे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपशिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची आणि त्यांच्या विचारांची महती सांगणारी माहिती दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थी त्रिवेणी रणसिंग, स्नेहल रणसिंग, कार्तिक बिजुले आणि स्वराज बोडखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाविषयी तसेच त्यांच्या महान कार्याविषयी माहिती सांगितली.
उदयोन्मुख व्याख्याता स्वीटी भुई यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर- एक युगपुरुष” या विषयावर त्यांच्या महान कार्याची महती सांगणा-या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या ओघवत्या शैलीत बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

तसेच या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी “पुस्तकवाचन” उपक्रम देखील घेण्यात आला.
यावेळी शा. व्य. स.चे अध्यक्ष संतोष झेंडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक औदुंबर मोरे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट , बिस्किटे , गोळ्या यांचे वाटप केले.

शाळेमध्ये उत्साहाने साजरा केलेल्या या जयंती कार्यक्रमासाठी खातगावच्या सरपंच सुवर्णा अविनाश मोरे , ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील आजी-माजी पदाधिकारी, महिला वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे आणि उपशिक्षक बाळासाहेब बोडखे तिच्यासह गावातील युवक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.