
खातगाव नं.२ शाळेस बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांची भेट
शिक्षक-विद्यार्थ्यांचे केले भरभरून कौतुक..
करमाळा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.२ या शाळेस सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बारामती ऍग्रोचे विद्यमान व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी भेट दिली आणि शाळेची एकूणच नेत्रदीपक वाटचाल पाहून शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या तसेच वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणाऱ्या खातगाव नं.२ या शाळेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . त्याच अनुषंगाने श्री गुळवे यांनी या शाळेस भेट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. इयत्ता चौथी पर्यंत असणाऱ्या या शाळेतील शिक्षकांनी आपल्या बालचमुंनासोबत घेऊन शाळेत फुलवलेल्या सेंद्रिय परसबागेचे भरभरून कौतुक केले. शाळेतील सेंद्रिय परसबाग, परसबागेतील विविध वनस्पतींची मराठी इंग्रजी नावे, सेंद्रिय खत निर्मिती, औषधी वनस्पती, परसबागेतील भाजीपाल्यातून मिळणारे घटक याविषयी शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी स्वराज बोडखे याने माहिती दिली.

त्याच प्रमाणे शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कार्तिक बिजुले याने ई लर्निंग युनिटचा प्रत्यक्ष वापर करून दाखवत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती प्रोजेक्टर वर दाखवली. शाळेत शिक्षण घेणारे सामान्य शेतकरी, शेतमजूर, तसेच नदीकाठी राहणाऱ्या मच्छीमार कुटुंबातील मुलेही ई लर्निंग युनिट सहज वापरतात हे पाहून उपस्थित सर्वांनीच संबंधित विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे आणि शाळेचे कौतुक केले.
शाळेचा स्वच्छ, सुंदर, हिरवागार निसर्गरम्य परिसर माळरानावरही उभे केलेले हे नंदनवन, शाळेतील क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, वाचनालय, नियोजित असे मुख्याध्यापक कार्यालय या सर्वच गोष्टी, त्याचा टापटिपपणा पाहून श्री गुळवे यांनी सर्वांचे भरभरून कौतुक केले.
शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी शाळेमध्ये राबवल्या जात असलेल्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती -जसे की, निसर्गाच्या सानिध्यात आनंददायी, कृतीयुक्त, खेळातून शिक्षण, परसबागेमध्ये अनुभवातून शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, गट पद्धतीचा वापर अशा विविध गोष्टींबाबत माहिती दिली.

शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे यांनी पुष्पगुच्छ आणि नारळ देऊन यांचे शाळेच्या वतीने स्वागत केले.
” शिक्षकांनी ठरवले तर शिक्षक शाळेत किती क्रांती घडवून आणू शकतात हे खातगाव नं.२ येथे आल्यानंतर कळते” असे गौरवोद्गार श्री गुळवे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत टाकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरिभाऊ गुळवे, शाळा व्यवस्थापन समिती खातगावचे समाधान तानवडे तसेच परिसरातील पदाधिकारी आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत , गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शि.वि.अ.संपत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णाताई अविनाश मोरे, शाळा स्थापन समिती अध्यक्ष संतोष झेंडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे आणि सहशिक्षक बाळासाहेब बोडखे यांचे विशेष कौतुक केले.
