
स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त 9 मार्च ते 13 मार्च आठवणीतील मामा भव्य अभिनव कृषी प्रदर्शनाचे आयोजन – दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांच्या कार्याचा वेगळा ठसा व योगदान हे मोलाचे उल्लेखनीय असून प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे नाते होते त्यामुळे येता 13 मार्च 2023 रोजी स्व. बागल मामांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य कृषी प्रदर्शनामध्ये आठवणीतील मामा… हे स्व. मामाच्या दुर्मिळ व संस्मरणीय अशा छायाचित्राचे अभिनव प्रदर्शन भरून भरवणार असल्याची माहिती श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी प्रदर्शनाचे स्वागत अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी पत्रकारांना दिली.

याबाबत सविस्तरपणे माहिती देताना बागल यांनी येत्या १३ मार्च रोजी लोकनेते माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल मामा यांची ६८ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने ९ मार्च ते १३ मार्च 2023 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एक भव्य कृषीप्रदर्शन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले असून या प्रदर्शनात कृषी विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती व विविध प्रकारचे 300 स्टाॅल्स असतील. या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय शेती,शेतीतील विविध क्रांतिकारी प्रयोग, पिके व फळबागाची माहिती देणारे स्टॉल, आयुर्वेदिक वनस्पती, नैसर्गिक शेती, शेतीतील अवजारे खते बी-बियाणे, आदींसह नानाविध प्रकारांची दालने याशिवाय खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, लहान मुलांसाठी खेळणी अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन भरविले जाणार आहे.

त्याच कृषी प्रदर्शनात करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री स्व. लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या दुर्मिळ व संस्मरणीय छायाचित्राचे संपूर्ण स्वातंत्र्य दालन उभा करणार असून ज्या ज्या व्यक्तीचा स्व. मामांशी कामाच्या निमित्ताने, उद्घघाटने, वाढदिवस, सत्कार समारंभ, सुख-दुःखाचे प्रसंग, मैत्रीच्या नात्याने अशा कोणत्याही निमित्ताने आपण सर्वांचाच संपर्क स्व. मामांशी आला असेल त्या अनमोल अशा क्षणाचे एखादे छायाचित्र म्हणजे फोटो आपल्याकडे नक्कीच असेल. हेच फोटो जनतेने आमच्या जयंती संमारंभ समितीकडे द्यावेत ते प्रतिनिधी आपणाकडे येतील. आपणाकडून फॉर्म भरून घेऊन त्यात सदरचा फोटो कधीचा आहे फोटोतील व्यक्ती कोण कोण आहेत तो फोटो कोणत्या तारखेचा आहे याचा तपशील आपल्याकडून घेतील व त्यातील काही निवडक व संस्मरणीय फोटोची निवड समिती करेल. नंतर हे फोटो स्कॅन करून आपण डिजिटल बनवून प्रदर्शनातील आठवणीतील मामा…. नावाचे दालनात जनतेला पाहण्यासाठी ठेवणार आहोत. स्व. मामांनी राजकारणात काम करताना राजकारणाच्याही पलीकडे जाऊन आपले मैत्रीचे नाते जपले होते.

स्व. मामांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले. त्यामुळे राजकारणात स्व. मामांचे जरी कोणाशी मतभेद असले तर ते वैचारिक पातळीवरचे होते, मतभेद कधीच नव्हते. त्यामुळे विरोधक देखील आजही स्व. मामांना वेगळा आदर देतात. त्यामुळे मी व्यक्तीशा: विरोधकांनाही स्व. मामाचा मुलगा या नात्याने विनम्रपणे राजकारण विरहित आवाहन करतो की त्यांनीही आपल्याकडील जतन करून ठेवलेला अनमोल क्षणाचा फोटो आम्हाला द्यावा सर्व फोटो स्कॅन करून ते ज्याचे त्याला सुरक्षितपणे माघारी देणार आहोत. यामागची संकल्पना अशी आहे की स्व. मामावर संपूर्ण तालुक्यासह राज्यातील जनतेने प्रचंड प्रेम केलं. किंबहुना आमच्या कुटुंबातील मी, माननीय मामीसाहेब अथवा माननीय रश्मीदीदी यांचेपेक्षाही स्व. मामांवर आपला म्हणजे सर्वसामान्य जनतेचा अधिकार सर्वात जास्त होता. स्व. मामांनी करमाळा तालुका हेच आपलं कुटुंब मानले होत. दिनदुबळे, सर्वसामान्य, पददलित गोर गरीब जनतेची त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवाच केली. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची वागणूक दिली. त्यामुळे या दालनासाठी सर्वांनीच आम्हाला सहकार्य करावे. यामुळे स्व. मामांच्या जुन्या संस्मरणीय आठवणींना, त्यांच्या कार्याला व त्या अनमोल क्षणांना उजाळा देण्याचा एक अल्पसा प्रयत्न आमचा आहे, त्यामुळे आपणा सर्वाचा भरघोस प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. तसेच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ व समारोप सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवर मंत्री, आमदार, स्व. मामांचे जुने सहकारी मित्र व हितचिंतक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम एलईडी स्क्रीन, लेजर किरणांचा नयनरम्य वापर, आधुनिक साऊंड सिस्टिम, संगणक प्रणाली वापर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्घाटन व समारोप सोहळ्यात केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यात करमाळा विधानसभा कार्यक्षेत्रातील देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बहाद्दूर शूर शहीद जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी शहीद जवानांच्या वारसाचा सन्मान समारंभाचे आयोजन केले आहे. या पाचही दिवसात दररोज सायंकाळी विविध असे अभिनव कार्यक्रम आयोजित केले असून त्यामध्ये ९ मार्च रोजी भव्य उद्घाटन समारंभ, महिलांसाठी माहेर मेळावा व हळदी कुंकू समारंभ त्याच कार्यक्रमात पाऊल एक पाऊल पुढे जात विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे शानदार आयोजन राहील, खेळ पैठणीचा कार्यक्रम, एक दिवस स्व. मामांचे आवडते वाद्य म्हणजे हलगी व लेझीम स्पर्धा आयोजित केली आहे. तर शालेय व महाविद्यालयीन मुला मुलीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सवाचे आयोजनही राहील. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व त्या संदर्भातील आवश्यक त्या समित्या गठीत केल्या असून तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल व साखर संघाच्या संचालिका नेत्या माननीय रश्मीदीदी बागल या संपूर्ण महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक असून या कार्यक्रमाची संकल्पना ही विद्या विकास मंडळाचे सचिव मार्गदर्शक आदरणीय विलासराव घुमरे सरांची आहे. आदरणीय नेत्या साखर संघ संचालिका रश्मी दीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली या अभिनव,भव्य व नियोजनबद्ध कार्यक्रमाची तयारी व नियोजन सुरू असून तालुका, जिल्हा व तमाम राज्यातील जनतेने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा व त्यानिमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन शेवटी कृषी प्रदर्शनाचे स्वागत अध्यक्ष मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले आहे.