
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर, 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार
सोलापूर, (जिमाका) दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याच अनुषंगाने त्या दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचारसंहिता लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमाणे असणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष तसेच शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले की, निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी 25 मे 2026, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून, नामनिर्देशन छाननी 2 जून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 जून, मतदान दिनांक 18 जून 2026 (गुरुवार) सकाळी 8 ते दुपारी 4 तर मतमोजणी 22 जून रोजी होणार असून निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख 25 जून 2026 आहे.

या निवडणुकीत एकूण 19 स्थानिक संस्था सहभागी होत असून, त्यात जिल्हा परिषद, सोलापूर महापालिका तसेच 17 नगरपरिषद व नगरपंचायतांचा समावेश आहे. एकूण मतदारसंख्या 616 असून, त्यात 544 सामान्य मतदार, 49 नामनिर्देशित व 23 अध्यक्षीय (पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष) मतदारांचा समावेश आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर चेंबर निश्चित करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी राहणार असून, अर्ज शुल्क 100 रुपये आहे. खुल्या गटासाठी ठेव रक्कम 10 हजार तर अनुसूचित जाती-जमातीसाठी 5 हजार रुपये आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.

मतदानासाठी एकूण 6 मतदान केंद्रे प्रस्तावित असून ती उपविभागीय अधिकारी स्तरावर उभारण्यात येणार आहेत. मतमोजणीचे केंद्र नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे राहील. आज सायंकाळपर्यंत मतदार यादी फायनल करून सर्व राजकीय पक्ष यांना देण्यात येतील तसेच तहसील कार्यालय गटविकास अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्शनी भागात ठेवण्यात येतील. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याचेही कार्तिकेयन यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता 18 मे ते 25 जून 2026 या कालावधीत लागू राहणार असून, निधीवाटप, धोरणात्मक निर्णय, प्रचार साहित्य, पोस्टर-बॅनर यावर निर्बंध असतील. तसेच प्रत्येक तालुक्यात FST, SST व VST अशा तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी दिली.