
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका व शहरातील प्रलंबित नागरी तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी आमसभा आयोजित करावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी केली आहे. प्रशासनाने आमसभा घेण्यास टाळाटाळ केल्यास मनसेच्या वतीने करमाळा गटविकास अधिकारी (BDO) यांना अनोख्या पद्धतीने ‘शिदोरी’ भेट देऊन आंदोलन करू असा इशाराही घोलप यांनी दिला आहे.

शासकीय नियमानुसार दरवर्षी आमसभा घेणे अपेक्षित असताना करमाळा तालुक्यात मागील आमसभा 31 मे 2025 रोजी झाली होती. त्यानंतर अद्याप 2026 सालची आमसभा घेण्यात आलेली नाही. मागील आमसभा देखील मनसेच्या मागणीनंतर आयोजित करण्यात आली होती, असे घोलप यांनी सांगितले.
दरम्यान, आमसभा न झाल्यामुळे तालुक्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून सध्या दुष्काळी स्थिती असून शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, शेती तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर थेट चर्चा होऊन त्यावर निर्णय होण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
त्यामुळे प्रशासनाने व आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिरंगाई न करता तातडीने आमसभेची तारीख जाहीर करावी अशी मागणी मनसेने केली आहे. आमसभा घेतली नाही तर मनसे कार्यकर्ते ‘शिदोरी’ घेऊन BDO कार्यालयात दाखल होतील, असा इशारा संजय (बापू) घोलप यांनी दिल्याने प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.