कमलाई नगरी
आशिष दिलीप अडसूळ (मो. नं 9657766555), एम. एस. सी. फिजिक्स शिक्षण घेतलेला एक उच्चशिक्षित तरुण. पण कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकरीच्या मागे न लागता शेती क्षेत्रालाच उद्योग मानून त्यात नवनवीन प्रयोग करून भरघोस अर्थार्जन मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या निर्णयासाठी त्यांना घरातील सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला. त्यांचे बंधू अनंत अडसूळ त्यांना फार्म डेव्हलपमेंट, पीक नियोजन, आर्थिक नियोजन यासाठी कायम मार्गदर्शन करत आले.

आपल्या शिक्षणाचा आणि अभ्यासू वृत्तीचा वापर त्यांनी शेतीमध्ये केल्यामुळे कोणत्याही पिकांच्या लागवड पद्धती, खत नियोजन, अन्न द्रव्ये व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा त्यांना लाखमोलाचा अनुभव आला आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील कोणत्याही अडचणींबद्दल मार्गदर्शन करून सर्वांचीच मदत करण्याच्या निस्वार्थी वृत्तीमुळे शेतीच्या माध्यामातून करमाळा शहर आणि ग्रामीणमध्ये हजारो युवक आणि शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत.

मागील पाच वर्षांमध्ये कलिंगड, पपई, मिरची, टोमॅटो, दोडका, झेंडू, केळी, पेरू अशा विविध पिकांमधून भरघोस उत्पन्न घेत त्यांनी सर्व युवक वर्गासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातून पुणे आणि मुंबई मार्केटला अडसूळ फार्मस नावाचा एक ब्रँड तयार झाला आहे. 2 वर्षांपूर्वी कलिंगडाची दुबईला निर्यात करण्यात आली होती.

यावर्षी त्यांनी निर्यातक्षम गुणवत्तेचे पेरू आणि केळीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. अरब देशांमध्ये दुबई, इराण या ठिकाणी त्यांनी केळीचे निर्यात केली . सव्वादोन एकरांत लावलेल्या 3000 झाडांमधून 65 ते 70 टन निर्यातक्षम उत्पन्न त्यांनी घेतले. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे दररोज कित्येक व्यापाऱ्यांची अडसूळ फार्मसवर रेलचेल असते. केळीसाठी त्यांना केळी एक्स्पर्ट गणेश माने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

गुणवत्तेच्या जोरावर व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण केल्यामुळे 30 रुपये असा दर घेत त्यांनी लाखोंचे उत्पन्न केळी या पिकातून घेतले आहे. पुढील वर्षीही केळी, डाळिंब, पेरू या पिकांचे उत्कृष्ट गुणवत्तेचे उत्पादन घेऊन निर्यात करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी नुकतेच पावणेदोन कोटी लिटर क्षमतेचे एक एकराचे शेततळे त्यांनी घेतले आहे.करमाळा शहराजवळ अडसूळ यांची शेती असल्यामुळे तालुक्यातील पर जिल्हातील नागरिक आशिष अडसूळ यांचा सल्ला घेऊन शेतकरी शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *