खातगाव 2च्या विद्यार्थ्यांनी लुटला शाळेच्या परसबागेतील सेंद्रिय ऊसाच्या रसाचा मनमुराद आनंद
करमाळा:- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेतील सेंद्रिय ऊसाचा रस पिण्याचा मनमुराद आनंद लुटला.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत परसबागेकडे विशेष महत्त्व देण्यात आले आहे. परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त, अनुभवातून आणि आनंददायी पद्धतीने शिक्षण तर देता येतेच शिवाय विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा यासारखी मूल्ये ही रुजविता येतात याच विचाराने शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी हा उपक्रम राबविला.


इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या या शाळेत दरवर्षी सेंद्रिय परसबाग तयार केली जाते. माळरानावर पुनर्वसित असणाऱ्या या शाळेच्या जवळचा परिसर खडकाळ असूनही या शाळेतील शिक्षकांनी नदीकडून माती आणून टाकून आपल्या जिद्दीच्या बळावर परसबाग उभी केली आहे. या परत बागेमध्ये मेथी, शेपू, चुका, पालक, वांगी ,टोमॅटो ,भोपळा, मिरची, कोथिंबीर, कांदा, फ्लावर, करडर्ई, कोबी अशा विविध पालेभाज्यांची लागवड तर केली जातेच शिवाय या शाळेने गेल्या वर्षभर मोठ्या कष्टाने ऊसही सांभाळला आहे. ही पूर्ण परसबाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते . कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गावरान गाईचे गोमूत्र आणि शेणखत याचाच वापर करून ही परसबाग फुलविली जाते.
या एका वर्षाच्या काळात ऊस लागवडीसाठी सरी तयार करणे, ऊसाच्या पे-यांची लागवड, ऊसाची बांधणी ,खुरपणी ,पाला साळणे , पाणी देणे अशा विविध कामांचे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मुलांना दिले. मुलांच्या मदतीने जोपासलेला हा ऊस तोडून नेऊन त्यांनी गावातील रसवंतीगृह चालक युन्नूसभाई शेख, लालाभाई यांच्याकडून रस बनवून घेतला आणि विद्यार्थ्यांनी हा रस मनसोक्त पिण्याचा आनंद लुटला.


या बालचमुंनासोबत घेऊन वर्षभर मोठ्या कष्टाने सेंद्रिय पद्धतीने सांभाळलेल्या ऊसाचा रस पिताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शिक्षकांनाही पूर्ण समाधान वाटले.
‌‌ वर्षभर सातत्य ठेवत अनुभवातून शिक्षण देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शि.वि.अ.संपत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, शा. व्य. स.चे अध्यक्ष संतोष झेंडे, खातगावच्या सरपंच सुवर्णा अविनाश मोरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे आणि सहशिक्षक बाळासाहेब बोडखे यांचे विशेष कौतुक केले .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *