अब्रू नुकसानीच्या धमकीला झांजुर्णेंचे थेट आव्हान; ‘दावा दाखल करा, पुराव्यांसह न्यायालयात सामना करेन’

करमाळा प्रतिनिधी : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता चांगलीच धार आली आहे. कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आप्पासाहेब झांजुर्णे यांच्या वक्तव्याला ‘चुकीचे, तथ्यहीन व खोडसाळ’ ठरवत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर झांजुर्णे यांनीही आक्रमक भूमिका घेत, “तुमच्यात एवढी धमक असेल तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा; मी न्यायालयात पुराव्यांसह सामना करेन,” असे थेट आव्हान दिले आहे.

भांडवलकर यांनी केलेल्या आरोपांच्या प्रत्युत्तरात झांजुर्णे म्हणाले की, “बागल गट दिनेश भांडवलकर यांना पुढे करून मला अब्रू नुकसानीची पोकळ धमकी देत आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही.” कारखान्याच्या कारभाराबाबत आपण केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचे सांगत, योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेत सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मकाई कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करत झांजुर्णे यांनी एनसीडीसीकडून मिळालेल्या सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीचा संपूर्ण हिशोब सभासद आणि शेतकऱ्यांसमोर मांडावा, अशी मागणी केली. “कारखाना चालविण्यात तुम्ही अपयशी ठरलात, हे आधी मान्य करा,” असा थेट सवालही त्यांनी केला.

“शेतकऱ्यांचे नुकसान झाले, कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आणि कारखान्याच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींवर माझ्याकडे पुरावे आहेत. न्यायालयात दावा दाखल झाला तर हे पुरावे सादर केले जातील,” असा दावा झांजुर्णे यांनी केला.

आदिनाथ आणि मकाई या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या परिस्थितीवरूनही त्यांनी बागल गटावर निशाणा साधला. “या दोन्ही कारखान्यांच्या अधोगतीसाठी बागल गटाचे नेते कारणीभूत असल्याचे मत करमाळा तालुक्यातील अनेक नागरिकांचे आहे. मग या सर्व नागरिकांवरही अब्रू नुकसानीचे दावे दाखल करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये,” असा टोला लगावत झांजुर्णे यांनी बागल गटाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. कारखान्यांच्या कारभारामुळे अनेक शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक अडचणी आल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, तालुक्यातील नागरिक संयमी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत झांजुर्णे म्हणाले की, “विरोधक आक्रमक नाहीत म्हणून तुम्ही नशीबवान आहात. अन्यथा तालुक्यात फिरणेही कठीण झाले असते.” विधानसभा निवडणूक लढविण्याच्या आणि जिंकण्याच्या स्वप्नांवरही त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली.

मकाई कारखान्यातील यंत्रसामग्री व भंगार विक्रीच्या आरोप-प्रत्यारोपांवरून सुरू झालेला हा वाद आता एनसीडीसीच्या कर्जाचा हिशोब, कारखान्याचा कारभार, शेतकरी-कर्मचारी हित आणि कथित गैरव्यवहारांचे पुरावे या मुद्द्यांवर केंद्रित झाला आहे. त्यामुळे आता केवळ आरोप-प्रत्यारोप न राहता संबंधितांकडून कागदपत्रे आणि पुरावे सार्वजनिक केले जातात का, याकडे सभासद व करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *