
शेतकऱ्यांना वेठीस धरून वीजपुरवठा खंडित करू नये – ‘मकाई’ चे अध्यक्ष दिग्विजय बागल यांची मागणी
करमाळा : तालुक्यातील अनेक भागातील शेतीपंपाचा वीजपुरवठा वीजवितरण कंपनीने अचानकपणे खंडित करण्याची सूचना दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असुन, प्राधान्याने वीजपुरवठा चालूच ठेवावा असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.

याबाबत अधिक बोलतांनी श्री. बागल म्हणाले की, या वीज वितरण कंपनीच्या वीजखंडित धोरणामुळे रब्बी पिके, कांदा, ज्वारी, फळबागा, त्याचबरोबर ऊसपिकांचेही नुकसान होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीजपुरवठा बंद केल्याने मुक्या जनावरांचे अतोनात हाल होणार आहे. वीजमंडळाने आपल्या बिलांच्या वसुलीसाठी सरकट वीज बंद करण्याची ही भूमिका गंभीर व चुकीची आहे.

वास्तविक पाहता वीज कंपनीने शेतकऱ्यांना एक तारीख अथवा नोटीस देऊन सदर वीजबिल वसुली करून घ्यावी. अश्या जुलुमी धोरणामुळे तालुक्याच्या सर्वच भागातील शेतकरी धास्तावले आहेत.
कोरोना,अतिवृष्टी व सातत्याने हवामान बदलामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांनीही वीज बील वेळेवर भरणे गरजेचे आहे. परंतु सरसकट वीज बंद करु नये. एखादी मुदत व नोटीस देऊन सहकार्य करून यावर तोडगा काढावा असे आवाहन श्री बागल यांनी केले.

शेतकरी नुकताच उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. पाणी सर्वत्र मुबलक असतांना आता वीजमंडळाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. याबाबत तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार सहानभूती पुर्वक करून वीज पुरवठा आहे असा सुरूच ठेवावा असे श्री.बागल यांनी म्हटले आहे.