भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला न.पा. करमाळा येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात संपन्न….

करमाळा-प्रतिनिधी
करमाळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला न.पा. करमाळा येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिलराज कांबळे यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यागमूर्ती माता रमाई यांचे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये किती मोलाचे स्थान होते? व त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या आयुष्याचा त्यागमय संघर्ष केला. हे संबंधित विद्यार्थ्यांना व महिला पालकांना ही त्याची जाणीव व्हावी. या उद्देशाने व रमाईंच्या त्यागी आयुष्यातून प्रेरणा घेऊन, प्रत्येक महिलाने सुखी संसार कशाप्रकारे केला पाहिजे? याचे विश्लेषण करण्यासाठी व्याख्यात्या प्राध्यापक सौ. शितल वाघमारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानातून वाघमारे यांनी उपस्थित पालक वर्गांना रमाईंनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कशाप्रकारे मोलाची भूमिका वटवली. त्याचप्रमाणे राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रसंत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्वांनीच त्यांचे जीवन जगत असताना, स्वतःचा कधीही विचार करता फक्त समाजाच्या विकास आणि उन्नतीचा विचार केला. व कोणताही त्याग करत असताना ते कधीही मागे सरले नाहीत. अशा अनेक उदाहरणातून वाघमारे यांनी उपस्थित पालक वर्गाला त्यांच्या व्याख्यानातून प्रभावीपणे माहिती दिली.

व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर दशरथअण्णा कांबळे यांनी संबंधित पालक वर्गाला संबोधित करत असताना सांगितले की, शाळेच्या हिताच्या दृष्टीने पालक वर्गाने हि शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे. येथील शिक्षक कोणत्याही विद्यार्थ्यांचे शत्रू नाहीत. ते प्रत्येक विद्यार्थ्यांला समाजातील एक सुसंस्कृत नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या पाल्याकडून काही चुका घडल्यास त्याला ते योग्य वेळी शिक्षाही करतात. परंतु पालकांनी आपल्या पाल्याला झालेल्या शिक्षेचा उगाच बाऊ न करता, पाल्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करावा. व आपल्या पाल्यांमध्ये कशाप्रकारे उच्चमूल्य रुजवली जातील. यासाठी सर्वांनी या गुरुजन वर्गाला साथ देणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे मनोगत यावेळी कांबळे यांनी मांडले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संजय कांबळे सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बस्कर पट्ट्या शाळेला भेट दिल्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित न.पा. शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक दयानंद चौधरी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना, आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या व शाळेतील किरकोळ अडचणी सुटाव्या. यासाठी रोख पाच हजार रुपये शाळा व्यवस्थापन समितीच्या हाती सुपूर्द केले. या कार्यक्रमानंतर शाळेचे उपशिक्षक दिपक जाधव सर यांनी वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी ६२०० रु. चा स्पिकर सेट भेट दिला. त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दशरथअण्णा कांबळे यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य, क्रीडा स्पर्धेतील क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे दिली व जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित सुनिल कांबळे यांनी ही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. शाळेतील विद्यार्थी सुर्यपुत्र व चंद्रगुप्त यांनी माता रमाईंची प्रतिमा शाळेला भेट दिली.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथअण्णा कांबळे हे होते. तर या कार्यक्रमासाठी केंद्रसमन्वयक दयानंद चौधरी सर, संजय कांबळे सर, अॕड. महादेव कांबळे, भीमदल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुनील भोसले, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिलराज कांबळे, उपाध्यक्ष शुभांगी कांबळे, सदस्य शिल्पा मंडलिक, प्रगती कांबळे, राणी कांबळे, अर्चना कांबळे, बौद्धाचार्य प्रशांत कांबळे, गौतम कांबळे, सुनील प्रेमा कांबळे, सौ. वंदनाताई कांबळे मॅडम, नामदेव कांबळे आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती. तर सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दीपक जाधव सर, मालन शेख मॅडम, यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विक्रम राऊत सर यांनी केले
