करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डुवाडी येथे आता नवीन दिवाणी न्यायालय सुरु होणार असुन करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केलेल्या मागणीस आता यश आले आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, माझ्या करमाळा मतदार संघास कूर्डुवाडीसह माढा तालुक्यातील छत्तीस गावे जोडलेली असल्याने या भागातील काही महत्वाच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होतो. या भागातील नागरिकांनी मागणी केलेल्या न्यायालयाचा प्रश्न आपण उचलून धरला व सातत्याने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करत राहीलो. आज मंत्रीमंडळाची बैठक अर्थात कॉबिनेट पार पडली व यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. यातील एक निर्णय हा करमाळा विधानसभा मतदारसंघातील न्यायालया संदर्भात होता. आजच्या बैठकीत कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता (विधि व न्याय) देण्यात आलेली आहे. यामुळे आता लवकरच पदनियुक्ती होऊन हे काम मार्गी लागणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर आमदार नारायण आबा पाटील यांच्या हातुन माढा तालुक्यातील जोडलेल्या गावांना विकासनिधीत सिंहाचा वाटा दिला जात आहे. तसेच या भागातील रस्ते, वीज, सिंचन व नागरिकांना देण्यात येत असलेल्या मुलभुत नागरी सुविधा यावर आमदार नारायण आबा पाटील हे लक्ष देऊन प्रश्न सोडवत आहेतच. परंतु न्यायव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. कुर्डुवाडी येथील आरोग्यासाठी ट्रामा केअर नंतर न्यायालयाच्या माध्यमातून आमदार नारायण आबा पाटील यांच्या हातुन हे दुसरे महत्वाचे काम मार्गी लागले असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.