करमाळा (प्रतिनिधी) :
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज (UMS) या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्राचे तिसरे राज्य अधिवेशन रविवार, दि.१३ सप्टेंबर २०२६ रोजी करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. टेंभुर्णी-अहिल्यानगर रोड बायपासवरील नालबंद मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच आरक्षण दिनाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि महाड मुक्ती रणसंग्रामाच्या शताब्दी वर्षानिमित्त हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. प्रा. हरी नरके आणि डॉ. गेल ऑमव्हेट यांच्या स्मृतींना हे अधिवेशन समर्पित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात जाती जनगणना, बहुजन प्रतिनिधित्व आणि घटनात्मक आव्हाने यावर चर्चा होणार आहे. आगामी जाती जनगणनेची स्थिती २०११ च्या सामाजिक-आर्थिक व जात जनगणनेप्रमाणे (SECC) होणार आहे का, तसेच आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची संविधानिकता व वैधता या विषयांवरही विचारमंथन केले जाणार आहे.
दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार असून यात SIR, NPR, NRC आणि CAA संदर्भातील नागरिकत्वाचे प्रश्न, मूलनिवासी समाजाच्या नागरिकत्वासमोरील संभाव्य आव्हाने, तसेच मूलनिवासी समाजाला त्यांच्याच भूमीवर विदेशी ठरवले जाण्याची शक्यता या विषयांवर चर्चा होणार आहे.
यासोबतच NEP, NEET-CET, TET परीक्षा व मूल्यांकन पद्धतीतील त्रुटी, उच्च शिक्षणाचे बाजारीकरण आणि पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने यावरही चर्चा होणार आहे. राष्ट्राच्या पुनर्निर्माणात विद्यार्थी, तरुण आणि महिलांचा सहभाग तसेच संघटनात्मक नैतिकता या विषयांवरही विचार मांडले जाणार आहेत.
या राज्य अधिवेशनाची अध्यक्षता UMS दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे करणार आहेत. अधिवेशनास महाराष्ट्रातील विविध भागांतून पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण, महिला तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *