करमाळा प्रतिनिधी

हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि शौर्याची अलौकिक परंपरा: नेरले-रोपळेची ऐतिहासिक ‘घोड्याची यात्रा’
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि ऐतिहासिक परंपरा जपणारी भूमी आहे. करमाळा तालुक्यातील नेरले आणि माढा तालुक्यातील रोपळे या दोन गावांच्या सीमारेषेवर फुललेली ‘घोड्याची यात्रा’ हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, भोसले-निंबाळकर या ऐतिहासिक घराण्यांच्या सोयरीकीचे आणि श्रद्धेचे एक अद्वितीय प्रतीक आहे.
संतांची गळाभेट आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य
रोपळे येथील ख्वाजा खालीलसाहेब हे धाकटे बंधू आणि नेरले येथील बहुद्दीनसाहेब हे मोठे बंधू… या दोन सुफी संत बंधूंची मंदिरे दोन्ही गावांत आहेत. धाकटे बंधू ख्वाजा खालीलसाहेब हे दरवर्षी आषाढ महिन्यातील गुरु पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी आपले थोरले बंधू बहुद्दीनसाहेब यांच्या भेटीसाठी घोड्यावरून नेरले येथे येतात. दोन वेगवेगळ्या धर्मांच्या आणि संस्कृतींच्या समन्वयातून साकारलेली ही परंपरा गेली कित्येक शतके अविरत सुरू आहे.
राजेभोसले पाटील व राजेनिंबाळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा
नेरले हे ऐतिहासिक गाव छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत वीरश्री मालोजीराजे भोसले यांनी वसविले. येथे भोसले-पाटील घराण्याची हजारो एकर जमीन आणि पांढऱ्या मातीच्या सहा बुरुजांचा, सुमारे ५० ते ६० फूट उंच भव्य गडी चा वाडा पडझड झालेली असली तरीही, आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. संपूर्ण परिसरात नेरले गावाएवढी पांढरी माती इतर कुठेही आढळत नाही. आज राजेभोसले घराण्याची १५ वी आणि १६ वी पिढी या गावात कार्यरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखूबाई साहेब यांचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्याशी झाला होता. त्यांचे नातू करमाळा नरेश राजे रावरंभा निंबाळकर यांना करमाळा, माढा, बीड, खर्डा, धाराशिव या भागाची जहागिरी मिळाली होती. राजे रावरंभा निंबाळकर यांची वंशज कन्या विठाबाई यांचा विवाह नेरले येथील राजेभोसले-पाटील घराण्यात झाला. विठाबाई यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आणि कुशल कारभाराने अनेक वर्षे नेरले गावची पाटीलकी समर्थपणे सांभाळली आणि गावाचा नावलौकिक वाढवला. म्हणूनच या गावाला प्रेमाने ‘विठाबाईचे नेरले म्हणून ओळखले जाते.
परंपरेची सुरुवात आणि ‘घोड्याची यात्रा’
राजे रावरंभा निंबाळकर हे श्री तुळजाभवानी मातेचे निष्णात भक्त होते. त्यांनी करमाळा येथे कमलाई देवी आणि माढा येथे माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले. करमाळावरून माढ्याला घोड्यावरून जात असत ते रोपळे येथील त्यांची स्वतःची गडी व वाडा आहे.रोपळे येथे ख्वाजा खालील साहेबांचे दर्शन घेत असत.अशाच एका प्रवासादरम्यान घडून आलेल्या अलौकिक प्रसंगानंतर, ख्वाजा खालीलसाहेबांच्या पादुका घोड्यावर ठेवून आषाढ महिन्याच्या पहिल्या गुरुवारी नेरले येथील बहुद्दीनसाहेबांच्या दर्शनाला जाण्याची परंपरा राजे रावरंभा निंबाळकर यांनी चालू केली. परंपरा राजे रावरंभा निंबाळकर यांचे वंशज भूम, शेंद्री, खर्डा, भाळवणी यांनी एकत्र जपली होती परंतु आता फक्त रोपळे येथील वंशज जपत आहेत.भूम येथील निंबाळकर वंशज जेव्हा सीना नदी ओलांडून नेरलेत येत असत,तेव्हा नदीला कितीही पाणी असले तरी ते घोड्यावरून पोहून नदी पार करत.त्यावेळी ग्रामस्थ आनंदाने “भूमचा राजा आला, भूमचा राजा आला!” असा जयघोष करत असे गावातील जुने लोक सांगतात यावरूनच या सोहळ्याला ‘घोड्याची यात्रा’ हे नाव पडले.
रोपळे येथील राजेनिंबाळकर यांचा गडीचा वाडा व प्रवेशद्वार
आजही दिमाखात उभा आहे.
यात्रेचे स्वरूप आणि विलोभनीय सोहळा
आषाढ महिन्याच्या पहिल्या गुरुवारी रोपळे येथून घोड्यावरून ख्वाजा खालीलसाहेबांच्या पादुका नेरले येथे आणल्या जातात. नेरले येथील बहुद्दीनसाहेब मंदिरामध्ये भोसले-पाटील, राजेनिंबाळकर आणि दोन्ही गावांचे ग्रामस्थ व मानकरी एकत्र येतात व एकमेकांना गळाभेट घेत
१. फूल मागण्याचा कार्यक्रम: मंदिरात दोन्ही घराण्याचे मानकरी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे श्रद्धेने ‘फूल मागण्याचा’ पारंपरिक विधी पार पाडतात.
२. शाही मिरवणूक व आदरातिथ्य: दर्शन आणि विधीनंतर घोड्यासह सर्व मानकरी भोसले-पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यावर येतात.घोड्याला पाटलाची डाळ चारली जाते नंतर सर्व ग्रामस्थ व उपस्थितांची डाळ चारण्याचा कार्यक्रम होतो रोपळेतील मानकरांसाठी पारंपरिक चहा-पानाचा कार्यक्रम व आदरातिथ्य झाल्यानंतर संपूर्ण नेरले गावात घोड्याची भव्य मिरवणूक काढली जाते.
३. रोपळेकडे प्रस्थान: नेरलेतील सोहळ्यानंतर सर्व मानकरी घोड्यासोबत रोपळे येथे जातात, रोपळे गावातही मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते व तिथे खूप मोठी यात्रा भरते.
नेरले-रोपळेची ही घोड्याची यात्रा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, ती महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासाची, राजेभोसले-राजेनिंबाळकर घराण्यांच्या रेशीमगाठींची आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची अजरामर गाथा आहे.. लेखक श्रीमंत औदुंबरराजे भोसले माजी सरपंच नेरले ,,श्रीमंत, डॉ.श्रीकांतराजे भोसले
