करमाळा प्रतिनिधी

एका लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या असभ्य भाषेचा आणि धमकीचा मुद्दा आता तापला आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नुकतेच खासदार संजय दिना पाटील यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते. मात्र, प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी खासदारांनी आपली मर्यादा ओलांडत पत्रकारांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. या घटनेमुळे राज्यातील पत्रकार वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

करमाळा येथील पत्रकारांनी या घटनेचा निषेध करत पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध नोंदवला. पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाला आरसा दाखवण्याचे काम करत असतो. अशा लोकप्रतिनिधींकडून होणारी अरेरावी आणि धमकीची भाषा सहन केली जाणार नाही.”

खासदारांच्या या विधानाची दखल घेत विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदार पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून विविध ठिकाणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत.

यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *