
करमाळा प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा यांच्या वतीने श्री देवीचामाळ येथील मुकबधीर शाळेस आर्थिक सहकार्य करण्यात आले. विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलची आवश्यकता असल्याने संस्थेच्या वतीने ६ हजार ७०० रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा तालुका अध्यक्ष संतोष (काका) कुलकर्णी यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या मदतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

यावेळी संस्थेचे तालुका कार्याध्यक्ष रविंद्र विद्वत, उपाध्यक्ष राजेंद्र सुर्यपुजारी, कार्यवाह निलेश गंधे, तसेच अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके व सचिव नरेंद्रसिंह ठाकूर उपस्थित होते. तसेच मुकबधीर शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सुविधांसाठी समाजातील विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी संस्थेच्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी मिळालेली ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.