
करमाळा प्रतिनिधी
15 जून पासून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देते खातगाव नं.१ शाळेतील शिक्षक बिभिशन सातपुते व बाळासाहेब बोडखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. चला चला शाळेत चला, मुला मुलींना शाळेत पाठवा, मुलगी शिकली-प्रगती झाली अशा घोषणा देत गावातील वातावरण भारावून टाकले.

कोर्टी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य वनिताताई सुभाष गुळवे यांच्या हस्ते गुलाबाची फुले आणि फुगे देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक अशा मोफत गणवेशाचे आणि पाठ्यपुस्तकाचेही वितरण यावेळी करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मिठाई भरवत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे, शा.व्य. स.चे अध्यक्ष नितीन कोकरे, उपाध्यक्ष आप्पासाहेब धायगुडे, टाकळी शाळेचे शा.व्य. स.चे अध्यक्ष समाधान तानवडे तसेच अनेक पालक आणि महिला वर्ग उपस्थित होता.

पहिल्या दिवसापासूनच सर्वांगीण शिक्षणावर भर देणार असल्याचे सांगून मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी प्रास्ताविक केले.
खातगाव नं.१ शाळेतील शिक्षक मोठ्या उत्साहाने आणि सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेचा कायापालट करीत आहेत, त्यांचा आदर्श घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे असे सांगत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आमच्या शाळेत अशा जल्लोषात आणि मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात असे कार्यक्रम होत असल्याने आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान वाटतो असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
उत्साह पूर्ण वातावरणात राबवलेल्या या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद सदस्या वनिताताई गुळवे, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि.वि.अ. मिनीनाथ टकले, जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे आणि सर्व ग्रामस्थांनी बिभिशन सातपुते आणि बाळासाहेब बोडखे यांचे भरभरून कौतुक केले.
