
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका व इंदापुर तालुक्याच्या मधुन भिमा नदीचे विस्तिर्ण पात्र असुन या नदीपात्रावर तीन पुल साकारताना दिसत आहेत. विशेषतः हे तिनही पुल स्व.नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादांनी निधी मंजुर केलेले पुल आहेत. कोंढार चिंचोली ता. करमाळा ते डिकसळ ता.इंदापुर असणारा जुन्या ब्रिटीश कालीन पुलाचे अस्तित्व संपल्यामुळे नवीन पुल मंजुरीनंतर काम चालु आहे. या करिता ५५ कोटींची तरतुद राज्य शासनाने केलेली आहे. कुगाव ता. करमाळा ते शिरसोडी ता. इंदापुर दरम्यान दुसरा पुल साकारत असुन यासाठी तब्बल ३८२ कोटी रुपये मंजुर असुन काम प्रगतीपथावर आहे तसेच मौजे चांडगाव ता. इंदापुर ते

पोमलवाडी ता. करमाळा दरम्यानचे पुला करिता ३४० कोटी रुपये मंजुर असुन त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच हे कामही चालु होईल. ही सर्व विकासाचे मार्ग साकार होताना मनोमन आनंद होतो. या करिता कार्यकुशल आणि महत्वाकांक्षी नेतृत्वाची गरज लागते. याशिवाय अशी कामे सहजासहजी साकारत नाहीत. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची आठवण यामुळे पावलोपावली आल्याशिवाय राहत नाही. या तीनही पुलांना उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नाव

देणेबाबत ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. या पुलांचे मंजुरी करीता झटणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे कामाची ही पावती तर आहेच परंतु सक्षम नेतृत्व असल्याशिवाय ही कामे मार्गी लागत नाहीत. या तीनही कामांकरीता इंदापुर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार व अभ्यासु नेतृत्व संजयमामा शिंदे यांनी केलेला पाठपुरावा व सहकार्य यामुळेच हे शक्य झालेले आहे. भविष्यकाळात अजुनही काही महत्वाकांक्षी विकासकामे दृष्टीक्षेपात आहेत. नक्कीच आपली विकासकामे करण्यासाठी आपले हे नेते अग्रेसर राहतीलच. परंतु उजनी पट्टयातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, मच्छीमार बांधवांनी आता आपल्या भागात वैयक्तिक व सामुहीक उद्योग

धंदे वाढविण्या वर भर दिला पाहिजे. कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे, पर्यटन महामंडळाच्या योजना राबविल्या पाहिजेत, आपल्या भागात चांगले हॉटेल्स, कॉटेज, लॉजिंग, बोटिंग सेंटर या उद्योगांना चालना दिली पाहिजे. भविष्यात या तिनही पुलांवरून वहातुक होऊन निलकंठेश्वर (कात्रज), किर्तेश्वर (केत्तुर), कोटलिंग (चिखलठाण), श्री हनुमान मंदीर (कुगाव) व अन्य काही ठिकाणच्या मंदिराला व परिसराला डेव्हलप केल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे. भिगवण-डिकसळ ते कोंढार-चिंचोली- कात्रज- पोमलवाडी- केत्तुर- पारेवाडी- जेऊर- चिखलठाण- कुगाव- कंदर-टेंभुर्णी- भिमानगर- इंदापुर- भिगवण पर्यंतचा परिसर उजनी पर्यटन मार्ग म्हणून विकसित होणार आहे. यासाठी या भागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली गावे स्मार्ट व ग्रीन व्हीलेज होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच भविष्यात उद्योगधंदयांची प्रगती

साधण्यासाठी या भागातील युवक मंडळींनी इतर ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेटून माहिती घेऊन आपल्या भागातील पर्यटनाला चालना दिली पाहिजे. आपल्या भागातील शेतकरी वर्गाला शेतीपुरक व्यवसायाच्या माध्यमातुन आर्थिक स्तर उंचविण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. या करीता सर्वांनी या विकास प्रक्रियेत सहभागी होवुन नवनवीन कल्पनांना साकार केले पाहिजे. आपला उजनी परिसर आणि उजनी परिसरातला प्रत्येक माणूस समृद्ध झाला पाहिजे आणि हे नक्कीच शक्य आहे.